Homeपुणे'संविधान सन्मान दौड २०२५' मध्ये सुमारे १० हजार नागरिक धावणार

‘संविधान सन्मान दौड २०२५’ मध्ये सुमारे १० हजार नागरिक धावणार

Newsworldmarathi Pune : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ‘अमृत महोत्सवी संविधान सन्मान दौड २०२५ ‘ चे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, बार्टी यांच्या वतीने करण्यात आले आहे. येत्या २५ जानेवारी २०२५ रोजी ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेची नाव नोंदणी सुरू झाली असून त्याला पुणेकरांसह देश , विदेशातील धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या स्पर्धेत विविध अंतरासाठी, विविध वयोगटातील सुमारे १० हजार नागरिक धावतील अशी माहिती ‘संविधान सन्मान दौड’ चे मुख्य आयोजक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी  सांस्कृतीक महोत्सव समितीचे सचिव दीपक  म्हस्के उपस्थीत होते.

अमृत महोत्सवी संविधान सन्मान दौड २०२५ ची माहिती देताना परशुराम वाडेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (BARTI), संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, सावित्रीाईं फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा हौशी अॅथलेटीक्स असोसिएशनच्या वतीने या ‘संविधान सन्मान दौड २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेचे हे तिसरे वर्षे असून मागील वर्षी या स्पर्धेत तब्बल ५० देशांचे ५ हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. तर यावर्षी सुमारे १० हजार स्पर्धक सहभागी होतील असा अंदाज आहे. यंदाची स्पर्धा २५ जानेवारी रोजी पहाटे ५.३० वाजता खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथून सुरू होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे.

तर पारितोषीक वितरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सामाजिक राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सामजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, बार्टी चे महासंचालक डॉ. सुनिल वारे,, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी,  पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा,  प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, रजिस्ट्रार ज्योती भाकरे, डॉ. विजय खरे ( विभाग प्रमुख संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्यासह शहर आणि जिल्ह्यातील आमदार, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणार आहेत.  या स्पर्धेला आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार अण्णा बनसोडे यांचे विशेष सहकार्य लाभाल्याचे वाडेकर यांनी सांगितले. 

दीपक म्हस्के म्हणाले, अमृत महोत्सवी संविधान सन्मान दौड २०२५ ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून सुरू होईल; त्यानंतर आयूका गेट, डॉ. आंबेडकर चौक, औंध रोड बोपोडी, भाऊ पाटील रोड, शाहू चौक येथून यु टर्न पुढे आई आप्पा मंदिर, विद्यापीठ मेन गेट, विद्यापीठ मेन बिल्डिंग आणि समारोप खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे होणार आहे. ही स्पर्धा 16 वर्षांखालील, 18 वर्षांखालील आणि खुल्या वयोगटात अशा तीन विभागात घेतली जाणार आहे. ती प्रामुख्याने 3 किलो मीटर, 5 किलो मीटर आणि 10 किलो मीटर अंतराची असणार आहे. याप्रमाणेच दिव्यांगांसाठीही दिव्यांग व्हीलचेयर रेस (अॅटोमॅटीक) आणि दिव्यांग व्हीलचेयर रेस (मॅन्यूअल) अशा दोन प्रकारात ही स्पर्धा घेतली जाणार असून ही दौड 2 किलो मीटर अंतराची असणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश विनामूल्य असून नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे.

२१ जानेवारी २०२५ ही नाव नोंदणीची शेवटची तारीख आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकास एक टी-शर्ट ,सर्टिफिकेट, मेडल, संविधानाची प्रत, नाष्ट्याचे किट, मेडिकल सुविधा देण्यात येणार आहेत, तसेच सर्व वयोगटातील पुरुष आणि महिला गटात पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना रोख बक्षिसे, स्मृती चिन्ह दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९८५०१११७१०, ९८२२४८३७१४, ९६५७०७५१२३, ९०२१८०८८९७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments