Homeपुणेदेशांतर्गत वैविध्यपूर्ण पर्यटनाला चालना मिळतेय : आपटे

देशांतर्गत वैविध्यपूर्ण पर्यटनाला चालना मिळतेय : आपटे

Newsworldmarathi Pune : “भारताला निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा वारसा लाभलेला आहे. निसर्गनिर्मित अद्भुत अशी अनेक ठिकाणे भारतामध्ये आहेत. पर्यटकांनी देशांतर्गत असलेल्या वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांचा अनुभव घ्यायला हवा. पर्यटन मंत्रालयाकडून यासाठी प्रोत्साहन दिले जात असून, नाविन्यपूर्ण पर्यटनस्थळांचा विकास व प्रसार केला जात आहे,” असे मत केंद्रीय पर्यटन मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी गौरी आपटे यांनी व्यक्त केले. कोकणातील कातळशिल्पे पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हायला हवीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Advertisements

भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या वतीने कॅप्टन निलेश जर्नी विथ विंग्जच्या सहकार्याने आयोजित तीन दिवसीय पाचव्या पुणे पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी झाले. शिवाजीनगर येथील हॉटेल सेंट्रल पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी पर्यटन मंत्रालयातील अधिकारी स्वाती बारसोडे, पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका शमा पवार, कॅप्टन निलेश गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष प्रवीण घोरपडे, सचिव प्रथमेश कुलकर्णी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. प्रसंगी निलेश गायकवाड लिखित ‘माझी मुशाफिरी’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

महाराष्ट्राच्या व देशाच्या समृद्ध पर्यटन वारशाचे दर्शन घडवणाऱ्या या फेस्टिवलमध्ये विविध गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे आणि दुर्लक्षित ठिकाणांबाबत माहिती दिली जात आहे. देशांतर्गत व विदेशातील पर्यटनाचे अनेक पर्याय असलेल्या जवळपास ५० टुरिस्ट कंपन्यांचे स्टॉल्स येथे आहेत. पर्यटनप्रेमींना प्रेरणा आणि महाराष्ट्र पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने हा फेस्टिव्हल पुणेकरांसाठी रविवारपर्यंत (दि. १९) विनामूल्य खुला असणार आहे. तीनही दिवस दर तासाला लकी ड्रॉ, तसेच दिवसांतून तीनवेळा ग्रँड लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.

शमा पवार म्हणाल्या, “आपण जगभर प्रवास करतो, पण जर आपल्याला आपल्याच महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती नसेल, तर हे अयोग्य आहे. महाराष्ट्राला पर्यटनाचा संपन्न वारसा लाभलेला आहे. परंतु अजूनही अनेक ठिकाणांची माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली नाही किंवा तिथे प्रवासाच्या सोयी उपलब्ध नाहीत. अशा ठिकाणांना लोकप्रिय करण्यासह तिथे पायाभूत सुविधांची निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनही पुढाकार घेत आहे.”

प्रवीण घोरपडे यांनी स्वागत केले. प्रथमेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सारंग भिडे यांनी सूत्रसंचालन केले. चंदन पठारे यांनी आभार मानले.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments