Newsworldmarathi Pune : नॅशनल बुक ट्रस्ट आणि पुणे पुस्तक महोत्सव यांच्यावतीने पुण्यात भव्य-दिव्य ग्रंथमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे सलग दुसऱ्या वर्षी यशस्वीरित्या आयोजन केल्याचे निमित्त साधून नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे यांच्या सत्कार सोहळ्याचे अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणे, संवाद, पुणे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे शनिवारी आयोजन करण्यात आले आहे.
सत्कार सोहळा शनिवार, दि. 25 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. सत्कार माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात येणार असून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे आणि संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. यंदाचा पुस्तक महोत्सव भव्य-दिव्य स्वरूपात आयोजित करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात जाहिरात केल्यामुळे लाखो वाचकांनी महोत्सवास भेट दिली आणि पुस्तक विक्री चांगली झाली.
पुस्तक महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल राजेश पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सत्कार सोहळ्यानंतर अभिजात वाचन संस्कृतीचा द्विपात्री संगीत-नाट्य आविष्कार ‘अक्षरगाणी’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना सुनील महाजन यांची असून निर्मिती संवाद, पुणे आणि ‘भावार्थ’ यांनी केली आहे. गायक व संगीतकार त्यागराज खाडिलकर, गायिका दीपिका जोग सादरीकरण करणार आहेत. संहिता लेखन प्रसाद मिरासदार यांचे असून दिग्दर्शन त्यागराज खाडिलकर यांचे आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.