Homeभारतचिन्मय विश्वविद्यापीठाकडून ‘स्कूल ऑफ कलायोगा’ची सुरुवात

चिन्मय विश्वविद्यापीठाकडून ‘स्कूल ऑफ कलायोगा’ची सुरुवात

पुणे
समृद्ध सांस्कृतिक परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात शुक्रवारी, ६ मार्च रोजी बाणेर येथे चिन्मय विश्वविद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ कलायोगा’ या नवीन संगीत शिक्षण संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. चिन्मय मिशनचे प्रमुख आणि चिन्मय विश्वविद्यापीठाचे कुलगुरू पूज्य स्वामी स्वरूपानंद यांच्या हस्ते या संस्थेचे उद्घाटन झाले.
चिन्मय विश्वविद्यापीठ ही एक आगळीवेगळी संस्था आहे, जिथे प्राचीन गुरु–शिष्य परंपरेचा वारसा आधुनिक विद्यापीठीय व्यवस्थेसोबत जोपासला जातो. बाणेर येथे सुरू झालेल्या ‘स्कूल ऑफ कलायोगा’मुळे भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण गुरुकुल पद्धतीने घेण्याची आणि त्याचवेळी मान्यताप्राप्त विद्यापीठीय पदवी मिळवण्याची एक अनोखी आणि समृद्ध संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.
या प्रसंगी बोलताना पुण्यातील ‘चिन्मय नाद बिंदू’च्या संचालिका तसेच ‘स्कूल ऑफ कलायोगा’च्या प्रमुख प्रमोदिनी राव म्हणाल्या, “भारत हा प्राचीन ज्ञानपरंपरा आणि तत्त्वज्ञानासाठी जगभर प्रसिद्ध आहे. आपल्या मूळांशी नाळ जोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण शोधण्याची तयारी असेल तर अनुभवाधारित शिक्षणाची मोठी संपदा आपल्याला येथे सापडते. स्वामी तेजोमयानंद यांच्या मते संगीताचा खरा उद्देश कला, कलाकार आणि रसिक यांना अधिक उंच आध्यात्मिक व सांस्कृतिक स्तरावर नेणे हा आहे. त्यामुळे संगीत शिक्षण केवळ कौशल्य विकसित करण्यापुरते मर्यादित न राहता या व्यापक उद्देशालाही समर्पित असले पाहिजे.”
‘स्कूल ऑफ कलायोगा’मध्ये चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम (बीए ऑनर्स इन म्युझिक), दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (एमए इन म्युझिक) तसेच संगीत विषयातील डॉक्टरेट (पीएचडी) अभ्यासक्रम उपलब्ध असतील. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांत हिंदुस्थानी गायन, बासरी आणि तबला या विषयांमध्ये विशेष अभ्यासाची संधी मिळेल. तर पीएचडी कार्यक्रमांत सादरीकरण, अध्यापन पद्धती, संगीतशास्त्र आणि भारतीय ज्ञानपरंपरा यांवरील सखोल संशोधनाला प्राधान्य दिले जाईल.
या संस्थेत चालणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सखोल, अनुभवाधारित आणि वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन मिळेल. यासोबतच शास्त्रशुद्ध शैक्षणिक रचना आणि संशोधनाभिमुख दृष्टिकोन हे या शिक्षणपद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरेल.
‘स्कूल ऑफ कलायोगा’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे राबवण्यात येणारी दोन स्तरांवरील अध्यापन पद्धती. यात एकीकडे गुरु विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीने अनुभवाधारित मार्गदर्शन करतात, तर सहाय्यक प्राध्यापक शैक्षणिक, सैद्धांतिक आणि संशोधनाधारित अध्ययनाला पाठबळ देतात. या दुहेरी पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो—ज्यामध्ये सखोल संगीतज्ञान, नियमित रियाज, सैद्धांतिक समज आणि संशोधन क्षमता यांचा समतोल साधला जातो.
‘स्कूल ऑफ कलायोगा’मध्ये संगीत हा केवळ अभ्यासाचा विषय नसून ती एक साधना आणि जीवनपद्धती मानली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मैफिली, बैठका, संगीत महोत्सव आणि विद्वानांशी संवाद अशा विविध सांस्कृतिक उपक्रमांनी समृद्ध अशा वातावरणात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments