Newsworldmarathi Pune : पुण्यातील एका तृतीयपंथीयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमभंग झाल्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. विष प्राशन करुन तृतीयपंथीयाने आपल्या आयुष्याची अखेर केली. रुपा देवी माहेश्वरी (सारंग पुणेकर पूर्वाश्रमीचे नाव) असे त्यांचे नाव असून त्या गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होत्या.
रुपा माहेश्वरी या सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुण्यात काम करत होत्या. पुण्यात त्यांनी अनेक आंदोलन आणि सामाजिक कार्य केलं आहे. नितेश राणे यांनी तृतीयपंथीयांसाठी हिजडा शब्दाचा प्रयोग केल्यानंतर बंड गार्डन पोलीस ठाण्याच्या समोर रस्ता रोखत त्यांनी आंदोलनही केलं होतं.
रूपा यांनी प्रियकराच्या घरापासून अगदी काही अंतरावर कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट सुद्धा लिहिली होती. रूपा यांचा मृतदेह प्रियकराच्या घरापासून जवळच्याच परिसरात आढळून आला. त्यांच्या मृतदेहाजवळ ही सुसाईड नोट आणि कीटकनाशकाची रिकामी बॉटलही सापडली. त्यामुळे या प्रकरणाची आता पोलिसांनी देखील दखल घेतली आहे
रुपा माहेश्वरी या उच्चशिक्षित आणि कवयित्री होत्या. जयपूर येथील एका तरुणासोबत त्यांचे प्रेम संबंध प्रस्थापित झाले होते. दोघांमध्ये परस्पर संमतीने प्रेमसंबंध सुरु होते. गेल्या तीन ते चार वर्ष हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी रुपा नेहमी जयपूरला जात असे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या दोघांची भेट झाली नव्हती. रूपा यांच्या प्रियकराचं वागणं बदलल्याची त्यांची तक्रार होती.
आपला मुलगा एका तृतीयपंथीयाच्या प्रेमात असल्याचं कुटुंबीयांना कळाल्यानंतर त्यांनी संबंधित तरुणाला रुपा यांच्याशी बोलणं बंद करायला सांगितलं. तेव्हापासून प्रियकर रुपाशी बोलत नव्हता. हाच विरह सहन न झाल्याने १३ जानेवारीला रूपा जयपूरला पोहोचल्या. तिथे प्रियकराच्या घरासमोर जाऊन त्याला हाका मारल्या. अनेक तास त्याची वाटही पाहिली. मात्र तो बाहेर आलाच नाही. त्यामुळेच रूपा यांना नैराश्य आलं