Newsworldmarathi Pune : पुण्यात दूषित पाण्यामुळे वाढणाऱ्या Guillain-Barré Syndrome (GBS) च्या प्रकरणांवर त्वरित मोफत उपचार व जलप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांची मागणी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली महापालिका आयुक्ताकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे शहरातील विविध भागांमध्ये, विशेषतः सिंहगड रोड आणि परिसरातील ग्रामीण भागांमध्ये दूषित पाण्यामुळे Guillain-Barré Syndrome (GBS) या गंभीर आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. राज्य आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत 67 रुग्णांची नोंद करण्यात आली असून, त्यातील 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दूषित पाण्यात norovirus आणि campylobacter bacteria आढळल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या स्थितीत त्वरित आणि प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी होणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सर्व रुग्णालयांमध्ये GBS रुग्णांसाठी मोफत उपचार व औषधोपचाराची तातडीने व्यवस्था करावी, उपचारासाठी लागणाऱ्या IVIG डोस आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, दूषित पाण्याचा मूळ स्त्रोत ओळखण्यासाठी त्वरित जलतपासणी मोहीम हाती घ्यावी, नियमितपणे प्रभावित भागातील पाणीपुरवठा यंत्रणेचे निरीक्षण करावे, जलप्रदूषणासाठी जबाबदार व्यक्ती, संस्था किंवा कारखान्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत आवश्यक पावले उचलावीत, दूषित भागांमध्ये नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकर सेवा उपलब्ध करून द्यावी, पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन व फिल्टर सुविधा नागरिकांना वितरीत कराव्यात, दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी, नियमित आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी या शिष्टमंडळात युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, ओबीसी विभागाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत सुरसे, पीएमटी चेअरमन शेखर कपोते, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सचिव चेतन अग्रवाल, अनिकेत सोनवणे उपस्थित होते.
यावेळी आयुक्तांनी संदर्भातली तपासणी करून योग्य त्या सूचना करण्याचे त्वरित अंमलबजावणी करण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊ असे अश्वस्थ केले.