Homeपुणेअर्थसंकल्प सर्वांनी समजून घेतला पाहिजे : मेहेर

अर्थसंकल्प सर्वांनी समजून घेतला पाहिजे : मेहेर

Newsworldmarathi Narayangao : फेब्रुवारी २०२५ मध्ये सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे महागाई, घटलेले उत्पन्न आणि छोट्या मोठ्या वस्तूंवर आकारला जाणारा वस्तू व सेवा कर यामुळे खरेदी शक्ती कमी झालेला शहरी व निम शहरी मध्यम वर्गाला यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. लघु आणि सूक्ष्म उद्योग क्षेत्र, महिला सक्षमीकरण, कृषी क्षेत्र, निर्यात क्षेत्र या संदर्भात अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी सकारात्मक परिणाम करणार आहेत. असे असले तरी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, तसेच सर्वसामान्यांच्या राहणीमान,रोजगार, खरेदी क्षमता इत्यादीवर देखील होणाऱ्या परिणामांची चर्चा घडवून आणण्यासाठी अर्थसंकल्प सर्वांनी समजून घेतला पाहिजे असे मत ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिलतात्या मेहेर यांनी अध्यक्षीय मनोगतातून मांडले.

ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव (पुणे) येथील अर्थशास्त्र व संशोधन केंद्राच्या वतीने एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पुणे जिल्ह्याचे विविध महाविद्यालयातील अर्थशास्त्र व बँकिंग विषयाचे अध्ययन व अध्यापन करणारे दोनशे पन्नास (२५०) विद्यार्थी व प्राध्यापक प्रत्यक्ष सहभागी झाले होते. तसेच केंद्रीय अर्थसंकल्प या विषयावरील ही कार्यशाळा ऑनलाईन स्वरूपात देखील व्यापारी वर्ग व नागरिकांना सहभागी होता यावे म्हणून तशी सुविधा करण्यात आली होती, अशी माहिती प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी यांनी दिली.

अर्थसंकल्पावरील कार्यशाळेचे उद्घाटन कार्यशाळेच्या प्रमुख पाहुण्या अर्थशास्त्राच्या अभ्यासिका व लेखिका डॉ. रिता शेटीया यांच्या हस्ते झाले. “केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ अंतर्गत डॉ. शेटीया यांनी “अर्थसंकल्पाचे अंतरंग” विशद करून महसुली व भांडवली अर्थसंकल्पाच्या बाजू उपस्थितांना उलगडून दाखविल्या. अर्थसंकल्पात कृषी, एमएसएमई, गुंतवणूक आणि निर्यात हे विकसित भारताच्या प्रवासातील इंजिन म्हणून भर देण्यात आला आहे, ज्यात समावेशकतेच्या भावनेने करण्यात येणाऱ्या सुधारणांचा इंधन म्हणून वापर केला जातो. या अनुषंगाने अर्थसंकल्पमध्ये अधिक तरतुदी आवश्यक आहेत. तसेच अर्थसंकल्पमध्ये कौशल्य विकास यावर भर दिला असून, याचा तरुणांना नक्कीच फायदा होणार आहे. एकूण जीडीपीच्या सहा टक्के शिक्षणावर खर्च झाला पाहिजे. ग्रामीण महिला, तरुण शेतकरी, ग्रामीण युवा, सीमांत आणि छोटे शेतकरी आणि भूमिहीन कुटुंबांवर लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे सरकारचे महत्वाचे उद्दिष्ट असले पाहिजे आणि याचबरोबर योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या होणे महत्वाचे आहे. तळागाळापर्यंत योजना पोहचवण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. तरच आपली “विकसित भारत – 2047” कडे खऱ्या अर्थाने वाटचाल होईल, असे डॉ.रिता शेटीया म्हणाल्या.
यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद भुजबळ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे विभाग प्रमुख श्री प्रशांत शेटे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. शिवाजी टाकळकर, कला शाखा समन्वयक डॉ. शरद कापले व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

एक दिवसीय कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांसाठी “केंद्रीय अर्थसंकल्प” या विषयावर आधारित वक्तृत्व स्पर्धा व भित्तिपत्रक सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे आयोजन नारायणगाव महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख आकाश कांबळे, अर्थशास्त्र संशोधन केंद्रप्रमुख डॉ. श्रीकांत फुलसुंदर, प्रा.सोनाली काळे व प्रा. सद्गुरु जाधव यांनी केले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments