Homeपुणेपुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे प्रवासादरम्यान मराठी साहित्य, कला, संस्कृतीचा...

पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे प्रवासादरम्यान मराठी साहित्य, कला, संस्कृतीचा जागर

Newsworldmarathi Pune : मराठी भाषेचा जागर करीत साहित्यिक आणि साहित्य रसिकांनी अनोख्या साहित्ययात्री संमेलनाची अनुभूती घेतली. पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे या रेल्वे प्रवासात मराठी साहित्ययात्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत झालेले हे मराठीतील पहिलेच आणि दीर्घकालीन साहित्य संमेलन ठरले.

सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या दिल्ली येथील 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे अशा रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष रेल्वेला शूर सेनानी महादजी शिंदे यांचे नाव दिले होते तर प्रत्येक बोगीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची नावे दिली होती. दि. 19 रोजी दुपारी या साहित्य संमेलनाचे उद्घाटन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. या दिवशी उदय सामंत यांनी साहित्यिक कलाकार यांच्याशी संवाद साधत पुणे ते अहमदनगर रेल्वे प्रवास केला. ही विशेष रेल्वे दि. 21 रोजी पहाटे दिल्ली येथे पोहोचल्यानंतर संमेलनाच्या पहिल्या टप्प्याचा समारोप झाला.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले साहित्यिक, साहित्य रसिक आणि कलाकार महादजी शिंदे एक्स्प्रेसमधून दिल्लीत आल्यानंतर 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उत्साहाने सहभागी झाले. साहित्य यात्री संमेलाच्या दुसऱ्या टप्प्याला रविवारी रात्री परतीच्या प्रवासात सुरुवात झाली आणि समारोप आज (दि. 25) सकाळी 8 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर झाला. या संमेलनाचे अध्यक्ष लेखक शरद तांदळे तर वैभव वाघ कार्यकारी अध्यक्ष होते.

सोमवारची (दि. 24) सकाळ अभंग, भजन, कीर्तनासह, पोवाड्याच्या सादरीकरणाने भक्ती आणि वीररसात चिंब झाली. ‌‘वाटेवरचा देवनाम‌’, ‌‘एका जनार्दनी शिव‌’, ‌‘ॐ नमो ज्ञानेश्वरा, करूणाकरा दयाळा‌’ आदी भक्तीगीते सादर करण्यात आली. विविध बोग्यांमध्ये सुरू असलेले कविता, कथा वाचन तसेच विविध कलांच्या सादरीकरणातून रसिकांना विविध साहित्य, कलाकृतींची आनंद मिळाला.

ढोल-ताशा पथकातील वादक तसेच अनेक हौशी कलाकारांनी मोठ्या उत्साहाने कलागुणांचे सादरीकरण केले. सायंकाळी वारकऱ्यांनी हरी नामाचा घोष करत, टाळ-मृदुंगाच्या साथीने दिंडी काढली. यात अनेक साहित्यप्रेमी सहभागी झाले होते.
नाशिक येथील वारकऱ्यांनी अभंग, हरिपाठ आणि भजन सादर केले. यात राजेंद्र सपकाळ, बाळासाहेब फराटे, सुखदेव सांगळे, लक्ष्मी घुले यांचा सहभाग होता.

सिंहगर्जना ढोल-ताशा पथकाच्या वादकांनीही कला सादर केली. सोलापूरचे कवी सुरेशकुमार लोंढे, बेळगावचे कवी महादेव खोत, कोल्हापूरचे कवी मकरंद वागणेकर यांनी कवितांचे वाचन केले. रेल्वेत प्रवाशांची काळजी घेणाऱ्या स्वयंसेवकांनी सामुहिक नृत्य-वादन करून सर्वांचे मनोरंजन केले. आटपाडीचे ढोलकी वादक सिद्धनाथ जावीर व माळशीरसचे संवदिनीवादक राजवर्धन वाघमारे यांच्या साथीने प्रवाशांनी भक्तीरचना सादर केल्या. युट्युब वरील सुप्रसिद्ध खास रे टीव्हीच्या रॅपर्सने अनेक दर्जेदार मराठी रॅप गाणी सादर करत मैफल रंगतदार केली.

पुणे ते दिल्ली या 34 तासांच्या आणि दिल्ली ते पुणे 31 तासांच्या प्रवासादरम्यान सोमनाथ चोथे, गणेश बेंद्रे, अभिजीत पोखर्णीकर, ऋषिकेश कायत, दिग्विजय पाटील, अथर्व पिसाळ, केदार काटे या सरहद, पुणेच्या युवा कार्यकर्त्यांनी प्रवाशांना तत्पर आणि विनम्रपणे सेवा पुरविल्या.
कर्तव्य मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांचे पथक दिमतीला होते. या पथकात आठ जणांचा समावेश होता.

रेल्वे प्रवासादरम्यान हे पथक प्रवाशांची सतत विचारपूस करत कोणाला आरोग्याची समस्या जाणवल्यास त्यांना वैद्यकीय मदत करत होते. डॉ. फैज सय्यद, डॉ. ऋषिकेश पाटील, डॉ. यश थोरात, डॉ. क्षितिज कुचेकर यांच्यासह गौरव गायकवाड, अनिकेत मोगरे, गणेश जानकर, यशवंत पवार यांचा वैद्यकीय पथकात समावेश होता.

या वर्षीचा उस्फूर्त प्रतिसाद, प्रवासा दरम्यान जोडली जाणारी मने, प्रत्येकाला मिळणारी सादरीकरणाची संधी आणि होणारी वैचारिक देवाण घेवाण पाहता दरवर्षी हे चाकावरचे मराठी साहित्ययात्री संमेलन सुरू ठेवावे असा आयोजकांचा विचार चालू असल्याचे संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष वैभव वाघ यांनी सांगितले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments