नागपूरमध्ये सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. या घटनेत तीन पोलीस उपायुक्तांसह ४० पेक्षा अधिक पोलीस जखमी झाले आहेत. यामध्ये जमावाने पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीने वार केला. रक्तबंबाळ झालेल्या कदम यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आज 18 मार्च मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉलद्वारे पोलीस उपायुक्त कदम यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट पोलिस उपायुक्त कदम यांच्यासोबतचा व्हिडीओ कॉलचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच, फडणवीस यांनी लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सोमवारी संध्याकाळच्या सुमारास महाल परिसरात दोन गटांमध्ये औरंगजेबच्या कबरीच्या वादावरून तणाव निर्माण झाला. काही वेळातच वाद विकोपाला गेला आणि जमावाने दगडफेक सुरू केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, संतप्त जमावाने पोलिसांवरही हल्ला चढवत जाळपोळ सुरू केली.
यावेळी जमावाने पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीचा वार केला. तर जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीच्या घटनेत डीसीपी शशिकांत सातव यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. डीसीपी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंटल इंज्यूरी झाली आहे. या तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


Recent Comments