Homeपुणेडॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश आमटे यांना 'एआयबीडीएफ'तर्फे गोंदण पुरस्कार जाहीर

डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश आमटे यांना ‘एआयबीडीएफ’तर्फे गोंदण पुरस्कार जाहीर

Newsworldmarathi Pune त्वचेच्या स्वयंप्रतिकार आजारांवरील इलाजासाठी मदत करणाऱ्या ऑटो-इम्यून ब्लिस्टरिंग डिसीज फाऊंडेशनच्या (एआयबीडीएफ) वतीने थोर समाजसेवक डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश आमटे यांना गोंदण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच आमटे दाम्पत्याच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘एआयबीडीएफ’चे संस्थापक अशोककुमार सुरतवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. शरद मुतालिक, अनिरुद्ध बंबावाले, जयंत हेमाडे, विजय नांदगावकर आदी उपस्थित होते.

अशोककुमार सुरतवाला म्हणाले, “ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते आमटे दाम्पत्याला यंदाचा पहिलाच ‘गोंदण पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. येत्या बुधवारी (ता. २ एप्रिल २०२५) सायंकाळी ६.३० वाजता डेक्कन क्लब हाऊस, डेक्कन जिमखाना, पुणे येथे हा पुरस्कार सोहळा होणार असून, पुरस्कार प्रदान केल्यानंतर प्रसिद्ध निवेदक प्रवीण जोशी आमटे दाम्पत्याची प्रकट मुलाखत घेणार आहेत. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे.”

डॉ. शरद मुतालिक म्हणाले, “त्वचेच्या आजारांकडे समाज आजही तुच्छतेने पाहतो. त्यामुळे अशा रुग्णांना आजारासोबत अन्य अडचणींचा सामना करावा लागतो. आर्थिक व सामाजिक संघर्षाला सामोरे जावे लागते. अशावेळी त्वचेच्या आजारांबाबत जागृती करून ऑटो-इम्यून ब्लिस्टरिंग आजारांनी ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी सुरु केलेला सामाजिक उपक्रम आहे.

अशोककुमार सुरतवाला यांच्या प्रेरणेने दिवंगत जयश्री सुरतवाला यांच्या स्मरणार्थ सुरु केलेल्या फाउंडेशनमार्फत लोकांमध्ये ऑटो-इम्यून ब्लिस्टरिंग आजारांविषयी जागरूकता वाढवण्यासह लवकर निदान व योग्य उपचारांसाठी मार्गदर्शन, गरजू रुग्णांना मदत देण्यात येते. तसेच या आजारांतून बऱ्या झालेल्या रुग्णांचे अनुभव पीडितांपर्यंत पोहचवून त्यांना प्रगत उपचार घेण्यास प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. यासह आधुनिक औषधोपचार सर्वांसाठी सुलभ व परवडणारे करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे.”

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments