Newsworldmarathi Pune: गगन अदिरा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, वाघोली येथील ‘Booze Craving Beer And Wine Shop’ या बिअर शॉपीला दिलेला परवाना पूर्णपणे बेकायदेशीर आहे, अशी नागरिकांची ठाम भूमिका असून, सदर शॉपीविरोधात आज जोरदार आंदोलन करण्यात आले.
सदर बिअर शॉपीस परवाना देताना स्थानिक सोसायट्यांचे व नागरिकांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) घेण्यात आलेले नाही. तसेच शासकीय नियम धाब्यावर बसवून, अनधिकृतपणे परवाना प्राप्त करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या बिअर शॉपीमुळे परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांवर विपरीत सामाजिक व मानसिक परिणाम होत असून, परिसरातील शांतता व सुरक्षितता धोक्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर 25 एप्रिल 2025 रोजी भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सातव यांच्या नेतृत्वाखाली संबंधित बिअर शॉपीसमोर गगन अधिरा, मॅजेस्टिक मेनहॅटन, पार्कलेन प्रीमियर, स्कायलाईट आदी सोसायट्यांतील नागरिकांनी तीव्र आंदोलन केले.

तत्पूर्वी, 23 एप्रिल 2025 रोजी संदीप सातव यांनी पुणे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डूड्डी तसेच राज्य उत्पादन शुल्क अधिकारी श्री. राजपूत यांच्याकडे नागरिकांचा हरकत नामा व स्वाक्षरीसह निवेदन सादर केले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळेच नागरिकांनी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारत, परवाना रद्द करण्याची जोरदार मागणी केली आहे.
निवेदनाच्या प्रतींसह संपूर्ण पुरावे सादर करण्यात आले असून, प्रशासनाने तत्काळ योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.


Recent Comments