Newsworldmarathi sambhajinagar: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, लाडक्या बहिणीचे मानधन २१०० रुपये आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करू, असं वचन महायुती सरकारने दिले होते. मात्र सत्ता मिळताच त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे जून महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील बंगल्याला घेराव घालण्यात येईल, असा इशाराच प्रहारचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. शहरातील संत एकनाथ रंगमंदिर येथे प्रहारचा विभागीय कार्यकर्ता मेळावा व संताजी धनाजी सन्मान पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू
बच्चू कडू म्हणाले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, लाडक्या बहिणीचे मानधन २,१०० रुपये करू आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करू, असे वचननाम्यात जाहीर केले होते; परंतु सत्ता मिळताच सरकार वचननामा पाळण्यास तयार नाही. त्यामुळे जून महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील बंगल्याला घेराव घालण्यात येईल.

पुढे म्हणाले, राज्यात निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने देऊन महायुतीच्या नेत्यांनी मते मिळवली. परंतु आता ते बोलण्यास तयार नाही. त्यामुळे आता या नेत्यांना सळो की पळो करून सोडण्याची वेळ आली आहे. यापूर्वी मंत्र्यांच्या घरासमोर मशाल आंदोलन केले. आता १४ मे रोजी कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री यांच्या घरासमोर रक्तदान शिबीर आयोजित केले जातील. हे अभियान प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदारपणे राबवावे.
शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास सरकार तयार नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. दिव्यांगांचे मानधन पंधराशे रुपयांवर करण्यास सरकार तयार नाही, किमान वचननाम्याची तरी पूर्तता करा, असं बच्चू कडू यांनी यावेळी सरकारला बजावले आहे.


Recent Comments