Newsworldmarathi Pune: रुई (ता. बारामती) गावचे सुपुत्र अभिजित रामदास चौधर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत देशात ४८७ वा क्रमांक मिळवून IAS/IPS सेवेसाठी यशस्वी निवड मिळवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महावितरण, बारामती परिमंडळातर्फे मा. मुख्य अभियंता पेठकर साहेब यांच्या शुभहस्ते अभिजित यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
अभिजित रामदास चौधर यांचा प्रवास संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या अभिजित यांनी पाच वेळा अपयशाचा सामना केला, मात्र हार न मानता सहाव्या प्रयत्नात देशात ४८७ वा क्रमांक मिळवून अखेर स्वप्नपूर्ती केली. येत्या वर्षभरात ते आयपीएस अधिकारी म्हणून सेवेत रुजू होणार आहेत.
त्यांच्या वडिलांनी रामदास चौधर यांनी परिस्थिती कठीण असतानाही मुलाच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले. शेती आणि इतर कष्टाची कामे करत त्यांनी आर्थिक तजवीज केली व अभिजितला शिक्षणासाठी सदैव प्रोत्साहन दिले.
अभिजित यांनी जिद्द, अथक परिश्रम आणि सचोटी या त्रिसूत्रीचा अवलंब करून दाखवून दिले की, प्रतिकूल परिस्थितीतूनही स्वप्नवत यश मिळवता येते. त्यांच्या या यशाने रुई गावासह संपूर्ण बारामती तालुक्याचा अभिमान वाढवला आहे.


Recent Comments