Newsworldmarathi Pune : पुण्यात बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आले आहे. याप्रकरणी पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २८ लाख रुपये मूल्य असलेल्या दोनशे व पाचशे रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीची व्याप्ती मोठी असून त्यामध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मनीषा स्वप्नील ठाणेकर (वय-३५, रा. नागपूर चाळ, येरवडा), भारती तानाजी गावंड (वय-३४, रा. केशवनगर, चिंचवड), सचिन रामचंद्र यमगर (वय-३५, रा. गहुंजे), नरेश भीमाप्पा शेट्टी (वय-४२, रा. लोहगाव) आणि प्रभू गुगलजेड्डी (वय-३८, रा. चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटक महिंद्रा बँकेतर्फे दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनंतर हा प्रकार उघडकीस आला. या बँकेच्या शिवाजीनगर शाखेत १७ एप्रिल २०२५ ला २०० रुपयांच्या बनावट नोटा जमा झाल्या असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. तेथील व्यवस्थापकांनी यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा प्रकार कळवला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक महेश बाळकोटगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या नेतृत्वाखाली सखोल तपास करण्यात आला.
असा झाला भांडाफोड?
बँकेत कोणत्या खात्यात ही रक्कम भरली गेली तेथून तपासाला सुरुवात झाली. संबंधित खातेधारकाने या नोटा खऱ्या असल्याचे समजून त्या खात्यात भरल्या होत्या. त्या व्यक्तीला ही रक्कम आरोपी मनीषा ठाणेकर हिने दिली असल्याचे चौकशीत उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यावर या टोळीचा छडा पोलिसांना लागला.
ठाणेकर ही खासगी बँकेतून कर्ज मिळवून देण्याचे व तत्सम आर्थिक व्यवसाय करते. तिच्याकडून पोलिसांनी दोनशे रुपयांच्या बनावट शंभर नोटा जप्त केल्या. तिच्या चौकशीत आरोपी भारती गावंड हिचे नाव उघडकीस आले. तिच्याकडून दोनशे रुपयांच्या तीनशे नोटा पोलिसांनी जप्त केल्या. तिच्या चौकशीत पुढे आलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सचिन यमगर याला ताब्यात घेतले. या तिघांनी कोल्हे नावाच्या व्यक्तीकडून या बनावट नोटा मिळवल्या असल्याचे स्पष्ट झाले.
प्रत्यक्ष तपासात कोल्हे हे नाव आरोपी शेट्टी धारण करीत असल्याचे निष्पन्न झाले. लोहगावमधील त्याच्या घरावर छापा टाकल्यावर पोलिसांना त्याच्या घरी चार लाख रुपये मूल्य असलेल्या दोनशे रुपयांच्या नोटा आढळल्या. या टोळीमध्ये प्रभू गुगलजेड्डी हाही सामील असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्यालाही अटक केली. एक लाख रुपयांना बनावट दोन लाख रुपयांच्या नोटा ही टोळी देत असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. त्याचबरोबर या टोळीमध्ये सामील असलेल्या अन्य आरोपींचीही माहिती पुढे आली असून त्यांच्या तपासासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
Recent Comments