Newsworldmarathi Mumbai: मुंबई मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईचे माजी महापौर, ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
दत्ता दळवी यांच्यासह धारावी, विक्रोळी, कांजुर, भांडुप, मुलुंडमधील महिला विभाग अध्यक्ष, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख ५०० हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. विक्रोळीत ठाकरेंना खिंडार पडले. शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मागील अडीच वर्षांपासून सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
दरम्यान, महायुती सत्तेत आल्यानंतर सरकारने मुंबई स्वच्छ करण्याचे काम केले. ब्रिटिशांनंतर महायुतीकडून पहिल्यांदा मुंबईचे रस्ते धुतले गेले, मात्र त्याआधी काहीजणांनी मुंबईची तिजोरी साफ केली, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी केली. या वेळी मंत्री भरत गोगावले, खासदार संदिपान भुमरे, शिवसेना नेत्या मीना कांबळी आदी उपस्थित होते.
७० विद्यमान नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई महापालिका काहीजण स्वतःची जहागिरीदारी समजत होते. मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर मुंबईतील रखडलेले प्रकल्प सुरू केले. मुंबईकरांना हक्काची घरे, आरोग्य सुविधा देण्याचे काम सरकार करतेय. आतापर्यंत शिवसेनेचे (ठाकरे गट) ४५ ते ५० नगरसेवक मूळ शिवसेनेत परतले आहेत. मुंबई पालिकेतील विविध पक्षांच्या जवळपास ७० विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल, असा विश्वास शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला.


Recent Comments