Newsworldmarathi Ahilyanagar : राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्यासह पद्मश्री विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन, संचालक व अधिकारी अशा ५४ जणांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून ८ कोटी ८६ लाख १२ हजार २०६ रुपयांचा अपहार करत कर्जमाफीस पात्र नसतानाही कर्जमाफी प्राप्त करून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत बाळासाहे ब केरुनाथ विखे (वय-६६, रा. लोणी बुद्रुक, ता. राहाता) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
याबाबत अधिक माहिती अशी की, कारखान्याच्या तत्कालीन संचालकांनी बनावट कागदपत्रे तयार करून बेसल डोस कर्जाचा प्रस्ताव तयार केला. युनियन बँक व बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने ३ कोटी ११ लाख ६० हजार ९८६ तसेच ५ कोटी ७४ लाख ४२ हजार २२० रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. परंतु शेतकरी सभासदांना ती रक्कम प्रदान करण्यात आली नाही.
कारखान्याचे तत्कालीन संचालक व बँकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून मोठा आर्थिक अपहार केला. शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून ८ कोटी ८६ लाख १२ हजार २०६ रुपयांचा आर्थिक लाभ स्वतःच्या फायद्याकरिता केला. कर्जमाफी प्राप्त नसताना ती प्राप्त असल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी आपण सर्वोच्च न्यायालयात आवाज उठवला होता. सर्वोच्च न्यायालयाने १८ मार्च २०२५ रोजी आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या इसमांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.


Recent Comments