Newsworldmarathi Pune: छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अभिनेता रितेश देशमुख, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज भारताचा इतिहास आणि भूगोलही वेगळा असता असे नमूद करून फडणवीस म्हणाले.
अनेक राजे-रजवाडे मोगलांच्या आधीपत्याखाली काम करत असताना आई जिजाऊंनी घडविलेल्या छत्रपती शिवरायांनी रयतेचे स्वराज्य स्थापन करून हिंदुस्थानाला नवी दिशा दिली. छत्रपती शिवरायांनी १८ पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. ‘हे माझे राज्य नसून रयतेचे राज्य आहे,’ अशी भूमिका त्यांनी घेतली. देव, देश आणि धर्मासाठी लढा देण्याची प्रेरणा देत त्यांनी सामान्य जनतेला मोगलांच्या जोखडातून मुक्त करण्याचे कार्य केले. त्यांच्या राज्यात समता, सन्मान, न्याय आणि स्त्रीसुरक्षा यांना प्राधान्य होते. शेतकरी समाधानी राहील, अन्याय-अत्याचार होणार नाहीत, अशी राज्यव्यवस्था त्यांनी उभी केली, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यकारभारात विविध सुधारणा करताना शिवाजी महाराजांनी सुमारे ५० प्रकारचे कर रद्द करून सुटसुटीत करप्रणाली निर्माण केली.
पाणी, जंगल यांचे नियोजन केले. भविष्यातील धोका ओळखून समुद्रमार्गे होणाऱ्या आक्रमणांना रोखण्यासाठी जलदुर्ग उभारले. पोर्तुगीजांवर विजय मिळवून पश्चिम किनारपट्टी सुरक्षित केली. छत्रपतींच्या कारकिर्दीत समुद्रमार्गे आक्रमण करण्याची हिंमत कुणालाही झाली नाही, अशा शब्दात त्यांनी महाराजांचे द्रष्टेपण मांडले. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष राज्यातील गड किल्ले देत असल्याचे नमूद करीत श्री. फडणवीस पुढे म्हणाले, पंतप्रधानांच्या पुढाकाराने शिवनेरीसह छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकित झाले असून २७ देशांनी एकमताने त्यास मान्यता दिली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी संबंधित प्रमाणपत्र स्वीकारले. त्यामुळे शिवरायांचे किल्ले आता अधिकृतपणे जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरवले गेले आहेत.
शिवरायांच्या कार्याची साक्ष असलेले राज्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.मराठा सेवा संघाच्या निवेदनावर राज्य सरकार सकारात्मक काम करेल, तसेच मांडण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांवर विचार करण्यात येईल, अशी ग्वाही देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील आणि जगभरातील शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या



Recent Comments