Newsworldmarathi Mumbai : Narendra Modi : संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्याला आज १ मे २०२५ रोजी ६५ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे आजच्या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या निमित्ताने आज राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट करत, महाराष्ट्रातील जनतेला मराठीतून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका महाराष्ट्र बजावत आहे. तसेच राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रातील जनतेला मराठीतून शुभेच्छा
“भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या, महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याच वेळी आपल्या मूळाशीही घट्ट जोडलेले आहे. राज्याच्या प्रगतीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.” असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आज मुंबईतील हुतात्मा चौक स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास वंदन केले. यावेळी पोलीस दलाकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत
भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन (वेव्हज्) शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज १ मे रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे. या वेव्हज् परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवित आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे.


Recent Comments