Newsworldmarathi Team: भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया दिली असून, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताच्या कारवाईला “युद्धाची कृती” (Act of War) म्हटले आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत त्यांनी सांगितले की, “शत्रूने पाकिस्तानच्या पाच ठिकाणांवर भ्याड हल्ला केला आहे. भारताच्या या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार पाकिस्तानला आहे. आणि आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देत आहोत.”
ते पुढे म्हणाले की, “संपूर्ण पाकिस्तान लष्करासोबत उभा आहे आणि आमचं मनोधैर्य मजबूत आहे. पाकिस्तान आणि त्याचं सैन्य शत्रूशी कसा मुकाबला करायचा हे जाणून आहे. आम्ही शत्रूच्या कोणत्याही वाईट हेतूला यशस्वी होऊ देणार नाही.”
या हल्ल्यांबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आरोप केला की, भारताने दहशतवादी छावण्यांच्या नावाखाली सामान्य नागरिकांवर आणि धार्मिक स्थळांवर हल्ले केले आहेत. ते म्हणाले, “या हल्ल्यात एका लहान मुलाचा आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या अद्याप स्पष्ट नाही. सात लक्ष्यांपैकी दोन काश्मीरमध्ये आणि पाच पाकिस्तानमध्ये आहेत.”
ख्वाजा आसिफ यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांना पाकिस्तानमध्ये येऊन परिस्थितीची सर्व बाजूंनी तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.
Recent Comments