Newsworldmarathi Pune: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय सेनेनं पाकिस्तानमधील अतिरेक्यांच्या तळांवर यशस्वी कारवाई केली. या ‘मिशन सिंदूर’च्या यशाचा उत्सव पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर महाआरती करून साजरा करण्यात आला. “वंदे मातरम”, “भारत माता की जय” आणि “नरेंद्र मोदी यांचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते श्रीमंत गणपतीची महाआरती करण्यात आली. या वेळी माजी नगरसेवक धनंजय जाधव, विशाल धनवडे, प्रमोद कोंढरे, महिला पदाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरतीनंतर बोलताना आमदार रासने म्हणाले की, “27 निरपराध पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या दिवशीच नरेंद्र मोदी परदेशातून आणि अमित शहा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ठामपणे सांगितले होते की, याचे उत्तर दिले जाईल. आजच्या कारवाईतून हे उत्तर मिळालं आहे.”
ते पुढे म्हणाले, “मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत शांतता आणि विकासाकडे वाटचाल करत असताना, कोणीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याला ठोस प्रत्युत्तर दिलं जाईल. पहलगाम हल्ल्यातील 27 पर्यटकांच्या मृत्यूला ही खरी आदरांजली आहे. ‘मिशन सिंदूर’ हे केवळ लष्करी कारवाई नव्हे, तर देशाच्या अस्मितेचं आणि वीर जवानांच्या शौर्याचं प्रतीक आहे.” या कार्यक्रमाद्वारे पुणेकरांनी भारतीय सेनेच्या पराक्रमाला सलाम करत श्रद्धांजली अर्पण केली.


Recent Comments