Newsworldmarathi Delhi: पाकसोबत युद्धाचा भडका उडण्याच्या शक्यतेमुळे भारतीय निमलष्करी दल जवानांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय सशस्त्र दलाने मध्यरात्री उशिरा हवाई हल्ल्याद्वारे पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केले. यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीवर गेलेल्या जवानांना पुन्हा तैनातीसाठी बोलावले जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व निमलष्करी दलाच्या प्रमुखांना सुट्टीवर गेलेल्या जवानांना परत बोलविण्यास सांगितले आहे. तसेच शाह सातत्याने जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत संपर्कात आहेत.
सीमावर्ती भागातील सामान्य लोकांना सुरक्षा सुनिश्चित करण्यास त्यांनी सांगितले आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये सामान्य नागरिकांच्या आश्रयासाठी बंकर तयार ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. देशातील अंतर्गत सुरक्षा स्थितीचा आढावाही शाह यांनी घेतला. सोबतच सुरक्षा अधिकाऱ्यांना सतर्क आणि कडा पहारा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


Recent Comments