Newsworldmarathi Pune : बारावीचा निकाल लागल्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या आहेत. अद्याप महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (महाराष्ट्र बोर्ड) दहावीच्या निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, पुढील दोन आठवड्यांत निकाल लागण्याची शक्यता आहे. त्याआधीच बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची माहिती दिली आहे, जी अकरावीच्या प्रवेशाशी संबंधित आहे.
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये धावपळ सुरू होते. या प्रक्रियेत कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून यंदा अकरावीचा प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात बोर्डाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती दिली आहे.
दहावीचा निकाल हाती लागताच, विद्यार्थी आपल्या गुणांनुसार योग्य कॉलेजची निवड करू लागतात. याच पार्श्वभूमीवर प्रवेशप्रक्रिया सुलभ व्हावी आणि वेळ वाचावा, यासाठी ऑनलाईन प्रवेशाचे पाऊल उचलण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी व पालकांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवावे, जेणेकरून प्रवेशाशी संबंधित सूचना आणि तारखा लक्षात येतील.
ही प्रणाली विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार असून, प्रवासाची गैरसोय न होता घरबसल्या अर्ज करता येणार आहे. बोर्डाचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा ठरणार आहे.
Recent Comments