Newsworldmarathi Mumbai : भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतची माहिती त्याने बीसीसीआयला दिली आहे. काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मानेही कसोटी फॉरमॅटला अलविदा केला होता. आता विराटच्या निर्णयामुळे क्रिकेटप्रेमींना दुसरा मोठा धक्का बसला आहे.
कोहलीच्या या निर्णयामुळे तो आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी संघात सहभागी होणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. मात्र बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कोहलीला निवृत्तीचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे निवड समिती काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये कोहली शेवटचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत खेळला होता. पर्थ कसोटीत त्याने शानदार शतक झळकावले, मात्र त्यानंतर त्याची कामगिरी फारशी प्रभावी ठरली नाही. या मालिकेत भारताला 1-3 असा पराभव पत्करावा लागला.
दरम्यान, 7 मे रोजी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत केली होती. तो एकदिवसीय क्रिकेट खेळत राहणार असला तरी, वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने टी-20 फॉरमॅटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. या दोन दिग्गजांच्या निवृत्त्यांमुळे भारतीय कसोटी संघात मोठा बदल अपेक्षित आहे.
Recent Comments