Newsworldmarathi Pune : सासवड येथील निबंधक कार्यालयात दस्त क्र. २५०१/२०२५ व २५०२/२०२५ हे बनावट व्यक्ती उभी करून नोंदवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी ब्रिगेडचे रोहन सुरवसे पाटील यांनी नोंदणी उप महानिरीक्षक उदयराज चव्हाण यांना निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी सांगितले की, काही व्यक्तींनी संगनमत करून खोटे दस्त तयार केले असून, मूळ मालकाच्या नकळत बनावट व्यक्तीद्वारे दस्त नोंदणी केली आहे. अशा प्रकारे ‘वन डिस्ट्रिक्ट – वन रजिस्ट्रेशन’ योजनेचा गैरफायदा घेत पुण्यासह राज्यभरात फसवणूक केली जात असल्याचे समोर येत आहे. उदाहरणार्थ, भोर तालुक्यातील जमिनीचा दस्त तळेगाव ढमढेरे येथे नोंदवून मूळ मालकाची फसवणूक करण्यात आली.
या गैरप्रकारांमुळे नागरिकांना आर्थिक, मानसिक व सामाजिक त्रास सहन करावा लागतो. बोगस दस्त नोंदल्यावर मूळ मालकाला न्यायासाठी वर्षानुवर्षे न्यायालयात लढावे लागते.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनाही निवेदन देण्यात आले आहे. उप महानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ अंतर्गत चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. राज्यभरातील नोंदणी कार्यालयांची चौकशी करण्यात येणार असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
– रोहन सुरवसे-पाटील
अध्यक्ष, स्वाभिमानी ब्रिगेड संघटना
Recent Comments