Newsworldmarathi Pune : भाजपचे मध्य प्रदेशमधील मंत्री विजय शहा यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून गुलाबो गँगच्या महिलांनी संताप व्यक्त केला असून, संबंधित मंत्र्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
गुलाबो गँगच्या महिलांनी पोलिसांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंत्री विजय शहा यांनी एका कार्यक्रमात भारताच्या शूर कन्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी अपमानास्पद आणि घाणेरडी टिप्पणी केली. “ती अतिरेक्यांची बहीण आहे” असे उद्गार त्यांनी काढल्याचा आरोप आहे. कुरेशी यांच्या कुटुंबातील तीन पिढ्या भारतीय सेनेत सेवा बजावत असून, अलीकडील भारत-पाक संघर्षात कर्नल कुरेशी यांनी निर्णायक भूमिका बजावली होती.
महिलांच्या मते, हे वक्तव्य केवळ कर्नल कुरेशी नव्हे, तर संपूर्ण देशातील महिलांचा आणि भारतीय सेनेचा अपमान करणारे आहे. त्यामुळे संबंधित मंत्र्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या निवेदनासोबत त्यांनी संबंधित भाषणाची व्हिडिओ क्लिप असलेली पेन ड्राइव्हही सादर केली आहे. “हे भाषण सर्वच टीव्ही चॅनेल्सवर दाखवले जात असून, आम्ही तपासासाठी स्वतंत्रपणे क्लिपही दिली आहे,” असे निवेदनात नमूद आहे.
“आपण आमचे मायबाप सरकार आहात, आम्हाला न्याय द्याल,” असा विश्वासही या महिलांनी व्यक्त केला आहे.
संगीता तिवारी, सोनिया ओवाळ, शोभा पणीकर, सुनिता नेमूर, मनीषा गायकवाड, सीमा महाडिक, सुवर्णा माने, रजिया शेख आणि बेबी राऊत यांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत.
Recent Comments