Newsworldmarathi Nanded: निझामाच्या गुलामीतून मुक्त झाल्यानंतरही कायम मागासलेल्या मराठवाड्यातील शेतकरी आजही कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकले आहेत. पाण्याचा अभाव, अल्पभूधारकता आणि वाढती शेतीची खर्चिकता यामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागत आहे. अशाच एका पार्श्वभूमीत जन्मलेल्या आणि वडिलांच्या आत्महत्येमुळे बालपणीच पितृछत्र हरवलेल्या दुर्गा क्षीरसागर आणि नियती इंगोले या दोन मुलींनी दहावीच्या परीक्षेत यश मिळवत क्रूर नियतीवर विजय मिळवला आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील दूरवरच्या वाडीत राहणाऱ्या या मुलींनी वडिलांच्या आत्महत्येनंतर बालवयातच जगण्याशी झुंज सुरू केली. वडील गेल्यानंतर शिक्षण सोडाच, पण दोन वेळचे अन्न मिळवणेही कठीण झाले. आई अशिक्षित आणि मोलमजुरीवर उदरनिर्वाह करणारी. अशा खडतर परिस्थितीतही दुर्गा आणि नियती यांनी हार मानली नाही.
सुदैवाने, पुण्यातील *भोई प्रतिष्ठान* या संस्थेच्या *पुण्यजागर* प्रकल्पांतर्गत त्यांना आधार मिळाला. सुमारे नऊ वर्षांपूर्वी या दोघींना पुण्यात आणून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी प्रतिष्ठानने घेतली. दोघींनाही पुरंदर तालुक्यातील वीर येथील *अस्तित्व गुरुकुल* या निवासी शाळेत दाखल करण्यात आले.
आज या दोघींनी त्या संधीचे सोने केले आहे. दुर्गाने दहावीत ८६.४० टक्के तर नियतीने ७७ टक्के गुण मिळवत आपल्या संघर्षाचे यशात रूपांतर केले आहे. या यशाबद्दल त्यांनी भोई प्रतिष्ठानचे डॉ. मिलिंद भोई यांचे आणि शेतात मोलमजुरी करून पोषण करणाऱ्या आपल्या मातांचे आभार मानले आहेत.
भोई प्रतिष्ठानने मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील २५ विद्यार्थ्यांना पुण्यात आणून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. दुर्गा आणि नियती यांची यशोगाथा केवळ प्रेरणादायी नाही, तर समाजातील अशा अनेक दुर्लक्षित मुलांसाठी आशेचा किरणही ठरते.
Recent Comments