Newsworldmarathi Bhavaninagar : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. सकाळी 9 वाजल्यापासून मतपत्रिकांची जुळवाजुळव सुरू झाली असून, पहाटे 11 वाजता सुरुवातीचे कल समोर येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कारखान्याचे सभासद आणि हितचिंतक याकडे उत्सुकतेने लक्ष ठेवून आहेत.
या निवडणुकीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी आणि बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, प्रथम ब प्रवर्गातील उमेदवारांचा निकाल जाहीर केला जाणार असून, त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची मतमोजणी होणार आहे.
काल शांततेत मतदान पार पडले. मतमोजणीची प्रक्रिया बारामतीच्या प्रशासकीय इमारतीतील यांत्रिकी भवन, जलसंपदा आणि लघु पाटबंधारे विभागाच्या दुसऱ्या मजल्यावर पार पडत आहे. यासाठी 38 टेबलांची रचना करण्यात आली असून मतमोजणी दोन फेरींमध्ये पूर्ण होणार आहे.
मतदानादरम्यान सुरुवातीला उन्हामुळे मतदारसंघात मतदानाची टक्केवारी 50% च्या आत होती. मात्र, दुपारी नागरिक मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी आले, त्यामुळे टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली. एका मतदाराकडे दहा मतपत्रिका असतानाही मतदान प्रक्रियेने वेग पकडला.
या निवडणुकीदरम्यान काही मतदारांची नावे मतदान यादीतून गायब असल्याचे आणि काहींच्या नावांची नोंद चुकीच्या मतदान केंद्रावर झाल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला. तरीही मतदानाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून, थोड्याच वेळात निकाल हाती येण्याची शक्यता आहे.


Recent Comments