Newsworldmarathi Mumbai : BJP District Chief Fake List : : भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या आठवड्यात भाजपच्या ५८ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर झाल्यानंतर आता समाजमाध्यमांमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष २०२५ या नावाने ८१ जिल्हाध्यक्षांची बनावट यादी फिरत आहे.
या यादीतील नावांमुळे अनेकांचा संभ्रम निर्माण झाला होता. सोशल मीडियात बनावट ८१ जिल्हाध्यक्षांची यादी व्हायरल झाल्याने भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियात जिल्हाध्यक्षांची व्हायरल झालेली यादी बनावट असून तिचा पक्षाशी कोणताही संबंध नाही, असे रवींद्र चव्हाण यांनी एका निवेदनाद्वारे म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाने १३ मे रोजी राज्यातील ७८ पैकी ५८ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. उर्वरित २० जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या
पक्षांतर्गत गटबाजी आणि राजकीय रस्सीखेच यामुळे लटकल्या आहेत. संपूर्ण राज्यात जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करताना पक्षाने सदस्य नोंदणी हा निकष लावला आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी मोठी चुरस आणि स्पर्धा असल्याने निवडीची प्रक्रिया खोळांबली आहे.
पक्षाने २० एप्रिल रोजी जिल्हाध्यक्ष निवडीसाठी त्या त्या निरीक्षकांची नेमणूक केली होती. संबंधित ठिकाणी पक्षनिरीक्षक जाऊन स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून आठवडाभरात प्रदेश कार्याध्यक्षांना अहवाल देणार होते. त्यानंतर १ मेपर्यंत जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात येतील, असे पक्षाकडून सांगण्यात आले होते.
दरम्यान, सोशल मीडियात सध्या ८१ जिल्हाध्यक्षांची व्हायरल झालेली यादी बनावट असून तिचा पक्षाशी कोणताही संबंध नाही. सदरील बनावट यादीत अनेक चुकीची नावे असून ती हेतुपुरस्सरपणे पसरवण्यात येत आहेत. या प्रकारामुळे पक्षाची बदनामी होण्याची शक्यता असून खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांविरोधात सायबर क्राईम अंतर्गत पोलीस तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
‘त्या’ यादीवर विश्वास ठेवू नका : विक्रांत पाटील
सोशल मीडियावर भाजप जिल्हाध्यक्ष २०२५ या नावाने फिरणारी ८१ जिल्हाध्यक्षांची यादी बनावट असून, तिचा पक्षाशी कोणताही संबंध नाही. आतापर्यंत भाजपच्या फक्त ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली असून अजून 22 जिल्हाध्यक्ष घोषित होणे बाकी आहे. त्यामुळे बनावट यादीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन भाजप नेते विक्रांत पाटील यांनी केले आहे.


Recent Comments