Newsworldmarathi Pune: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस परिसरात खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले. शनिवारी (दि. २४ मे) सायंकाळच्या सुमारास साई बेकरीजवळ खड्ड्यांमध्ये अडकून एकामागून एक नऊ ते दहा चारचाकी वाहनांचे टायर फुटले. त्यामुळे वाहनचालकांना अडचणीत सापडावे लागले. विशेष म्हणजे, महामार्ग प्रशासनाकडून कोणतीही तत्काळ मदत मिळाली नसल्याचा आरोप अपघातग्रस्तांनी केला आहे.
पाटस गावाजवळील उड्डाणपूल संपल्यानंतरच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, या ठिकाणी वाहनांचा वेग अधिक असल्याने गाड्यांना धक्का बसून टायर फुटण्याच्या घटना घडल्या. काही गाड्यांमध्ये महिला व लहान मुले असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला.
अपघातग्रस्त वाहनचालक गणेश आव्हाड यांनी सांगितले की, “रस्त्यावर अचानक मोठा खड्डा आला आणि आमच्या गाडीचे दोन्ही टायर फुटले. गाडीत कुटुंबासह प्रवास करत होतो. अपघात थोडक्यात टळला. आम्ही पाटस टोल नाक्यावर मदतीसाठी कॉल केला, पण कोणतीही मदत मिळाली नाही.”
घटनेनंतर टोल नाक्यावरील पेट्रोलिंग व्हॅनने घटनास्थळी येऊन खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यापूर्वीच अनेक वाहनांचे नुकसान झाल्याने संतप्त प्रवाशांनी टोल प्रशासनाच्या हलगर्जीपणावर रोष व्यक्त केला.
दरवर्षी मान्सूनपूर्व काळातच महामार्गावर खड्डे पडण्याचे प्रमाण वाढत असून, वाहनचालकांचे प्राण धोक्यात येत आहेत. या प्रकारांमुळे महामार्ग विकास प्राधिकरण व टोल व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वाहनचालकांनी मागणी केली आहे की, रस्त्यांच्या देखभालीकडे गांभीर्याने लक्ष दिले जावे आणि टोल भरूनही वेळेवर मदत न मिळणे ही गंभीर बाब असून, संबंधित प्रशासनावर कारवाई व्हावी.


Recent Comments