Homeपुणेहृदयद्रावक घटना...! चाकणमध्ये पाझर तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू; परिसरात शोककळा

हृदयद्रावक घटना…! चाकणमध्ये पाझर तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू; परिसरात शोककळा

Newsworldmarathi Pune: जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकणजवळील मेदनकरवाडी व कडाचीवाडी परिसरात शनिवारी (३१ मे) दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार १३ वर्षीय शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

ओमकार बाबासाहेब हांगे (वय १३, सध्या रा. मार्तंडनगर, मेदनकरवाडी, मूळ रा. मस्साजोग, ता. बीड), श्लोक जगदीश मानकर (वय १३, सध्या रा. मेदनकरवाडी, खंडोबा मंदिराच्या मागे, मूळ रा. धनवडी, ता. वरुड, जि. अमरावती), प्रसाद शंकर देशमुख (वय १३, सध्या रा. मेदनकरवाडी, बोरजाईनगर, मूळ रा. अंबुलगा, ता. मुखेड, जि. नांदेड), नैतिक गोपाळ मोरे (वय १३, सध्या रा. मेदनकरवाडी, मार्तंडनगर, मूळ रा. झरी बाजार, ता. अकोट, जि. अकोला) अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी ११ वाजता ही चारही मुले एकत्रितपणे पी. के. टेक्निकल कॉलेजच्या पाठीमागील पाझर तलावात पोहण्यासाठी गेली होती. दुपारीपर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. तलावाच्या काठावर मुलांचे कपडे आणि चप्पल आढळून आल्याने शंका बळावली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने तलावात शोध घेतला आणि चौघांचे मृतदेह बाहेर काढले. मुलांची दमछाक झाल्याने ते बुडाले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

परिसरात शोककळा

या घटनेमुळे मेदनकरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. मृत मुलांची कुटुंबे चाकण एमआयडीसीमध्ये नोकरी किंवा भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करत होती. चारही कुटुंबे भाड्याच्या घरांमध्ये राहत होती. या दुर्दैवी घटनेने त्यांच्या आयुष्यात मोठा आघात झाला आहे.

पोलिसांची कारवाई:
चाकण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसराला हादरवून टाकले आहे. मुलांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments