Homeपुणेमुलांनो खूप मोठे व्हा आम्ही तुमचा पाठीशी आहोत; सहपोलीस आयुक्त रंजन कुमार...

मुलांनो खूप मोठे व्हा आम्ही तुमचा पाठीशी आहोत; सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा

Newsworldmarathi Pune: मुलांनो, तुमच्यावर आलेले संकट हे दुर्दैवी आहे तरीपण तुम्ही त्याच्यातून उभे राहा, खूप खूप शिका तुम्हाला शिक्षणासाठी जी काय मदत लागेल ती करायला मी स्वतः आणि सर्व पुणेकर सदैव तयार राहतील असे प्रतिपादन पुण्याचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी व्यक्त केले.

पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या वतीने पुण्य जागर या प्रकल्पांतर्गत गेली दहा वर्षे अर्धापूर, जि. नांदेड येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले आहे. या मुलांचा शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ मा. सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर ,माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उद्योगपती कृष्णकुमार गोयल, ललित जैन, शिक्षण तज्ञ डॉ. फुलचंद चाटे,श्रीमती प्रमिला गायकवाड, अजय पाटील , विचारवंत श्रीकांत शिरोळे, ज्येष्ठ विधीज्ञ एड. प्रताप परदेशी, एड. शिवराज कदम, प्रशांत गोरे, सुपर माईंड च्या अर्चिता मडके आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रकल्पाचे समन्वयक आणि भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ.मिलिंद भोई यांनी या प्रकल्पाची माहिती देताना, नांदेड येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले पुण्यातील अस्तित्व गुरुकुल या निवासी शाळेत शिक्षण घेत असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावला आहे. ही आपल्या सर्वांसाठी समाधानाची बाब आहे असे सांगून अजूनही नांदेड मधील अर्धापूर बरोबरच इतर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची साडेतीनशे विद्यार्थी या प्रकल्पातून शिक्षण घेण्यासाठी उत्सुक आहेत असे सांगितले.

पुण्यातील शिक्षण तज्ञ डॉ. फुलचंद चाटे, प्रा. सुधाकर जाधवर, कृष्णकुमार गोयल, ललित जैन, श्रीमती प्रमिला गायकवाड, अजय पाटील या संवेदनशील पुणेकरांनी त्वरित या साडेतीनशे विद्यार्थ्यांची शैक्षणिक पालकत्व घेण्याची तयारी दर्शवली आणि या मुलांना चांगले नागरिक घडवण्यासाठी जे काही लागेल ते मदत करण्याचे आश्वासन दिले.

आता लवकरच नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या साडेतीनशे मुलांचा या प्रकल्पात प्रवेश निश्चित झाला असून त्यांच्या प्रगतीसाठी पुणेकर सदैव कार्यरत राहणार आहेत.

या प्रकल्पातील विद्यार्थिनी दुर्गा क्षीरसागर आणि नियती इंगोले यांनी मनोगत व्यक्त करताना , आमचे वडील गेल्यानंतर आम्ही शेती कामात आईला मदत करत होतो त्यामुळे आमचे शिक्षण थांबले होते पण या प्रकल्पामुळे शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये आम्हाला शिक्षण घेण्याचे संधी मिळाली हे आमचे भाग्य असून या संधीचे आम्ही नक्की सोने करू करून दाखवू असे प्रतिपादन करताच उपस्थित त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ.पराग काळकर यांनी बोलताना केवळ वडिलांनी आत्महत्या केली म्हणून तुम्ही शिक्षण अर्धवट सोडू नका, तुम्ही फक्त जिद्द धरा आम्ही भोई फाउंडेशनच्या माध्यमातून सदैव तुमच्या पाठीशी राऊ असा विश्वास या विद्यार्थ्यांना दिला. या निमित्ताने इयत्ता दहावी आणि बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला .

मराठवाडा आणि विदर्भातील विविध तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या भोई प्रतिष्ठानच्या पुण्यजागर प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिले. आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले.उदय जगताप यांनी आभार प्रदर्शन केले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments