Newsworldmarathi Pimpri: आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. निवडणुकीची चाहूल लागताच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रभागरचनेच्या संभाव्य रूपाची चाचपणी सुरू केली आहे. यावेळी राज्य सरकारने पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रभागसंख्या व रचना मागील निवडणुकीप्रमाणेच राहणार असून, केवळ आरक्षणामध्ये फेरबदल होणार आहे. या निर्णयाला राजकीय वर्तुळातून दुजोरा मिळत आहे.
महापालिकेची मागील निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पडली होती. त्या नगरसेवकांचा कार्यकाळ १२ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला. २०१७ मध्ये भाजप सरकारने पूर्वीच्या द्विसदस्यीय प्रभागपद्धतीऐवजी चार सदस्यीय पद्धती लागू केली होती. सध्याचे राज्य सरकारदेखील त्याच धोरणावर ठाम असून, महापालिकांना त्या पद्धतीनेच प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे निवडणूक प्रक्रिया न्यायप्रविष्ट झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात राज्य सरकारला चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रभागांची संख्या ३२ इतकी राहणार असून, प्रत्येक प्रभागात चार सदस्य निवडले जातील. परिणामी, महापालिकेत एकूण १२८ नगरसेवक निवडून दिले जातील. सध्या १३ मार्च २०२२ पासून महापालिकेत प्रशासक राजवट लागू आहे. आता निवडणुकीच्या हालचालींना गती मिळण्याची शक्यता आहे.


Recent Comments