Homeपुणेडीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार

डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार

Newsworldmarathi Pune: पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव केवळ पुण्यापुरता मर्यादित राहिला नसून अवघ्या जगाचे आकर्षण झाला आहे. हा गणेशोत्सव डीजेमुक्त आणि धार्मिक व आपल्या संस्कृती परंपरेप्रमाणे साजरा झाला पाहिजे, यासाठी यंदाच्या गणेशोत्सवात डीजेवर लावणाऱ्या गणेश मंडळांना जाहिरात स्वरूपात आर्थिक साह्य न करण्याची भूमिका ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी जाहीर केली आहे.

‘समर्थ प्रतिष्ठान’च्या ढोल-ताशा पथकाच्या वाद्य पूजन कार्यक्रमात बालन बोलत होते. खासदार मेधा कुलकर्णी, कसबा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बालन म्हणाले, ‘‘पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला १३२ वर्षाहून अधिक काळ झाला आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत जनतेने एकत्र येऊन लढा देण्यासाठी लोकमान्य टिळक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते.

मात्र, अलीकडच्या काळात काही मंडळे मोठमोठ्या स्पीकर्सच्या भिंती उभारून त्यावर अश्लील गाणी लावून गणेशोत्सव साजरा केल्याचे आढळते. यामुळे गणेशोत्सवाला गालबोट लागत आहे, हे आपल्या संस्कृतीला शोभत नाही. त्यामुळे डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची गरज असून त्यासाठी आता पावले उचलण्याची गरज आहे.’’

गणेश मंडळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी माणिकचंद ऑक्सिरीच आणि पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून जाहिरातीच्या स्वरुपात गणेश मंडळांना मोठ्या प्रमाणात आर्थिक साह्य केले जाते. परंतु आपल्या गणेशोत्सवाचे वैभव कायम राखण्यासाठी डीजे वर नको ती गाणी लावून आपल्या बाप्पाचे पावित्र्य भंग करणार्या मंडळांना यापुढील आर्थिक साह्य केले जाणार नाही, असे बालन यांनी स्पष्ट करतानाच आपल्या हिंदू देवतांचा उत्सव हा धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीनेच साजरा झाला पाहिजे अशी ठाम भुमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेचे समाजातील सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments