Newsworldmarathi Pune: कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव काळात गणेश मूर्ती विसर्जन भक्तिमय वातावरणात पार पडले. प्रभाग क्रमांक ३८, ४१, ४२ तसेच गुजर–निंबाळकरवाडी, पिसोळी व वडाचीवाडी या नव्याने समाविष्ट गावांसह एकूण १२ ठिकाणी पुणे महानगरपालिकेने विसर्जनाची व्यवस्था केली होती. याशिवाय शाडू मातीच्या गणेश मूर्तींसाठी स्वतंत्र टाक्या उपलब्ध करून देण्यात आल्या.
अकरा दिवसांच्या या गणेशोत्सव काळात एकूण २५,७८३ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्याचबरोबर पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत तब्बल ३२,५५६ किलो निर्माल्य वेगळे संकलित करण्यात आले. उत्सव काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी स्वच्छता, विद्युत व्यवस्था, टेबल-खुर्च्या, शौचालये (स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र), सीसीटीव्ही कॅमेरे तसेच निर्माल्य संकलनाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
या संपूर्ण कालावधीत विसर्जन व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी जवळपास २०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यात सहाय्यक महापालिका आयुक्त, उपअभियंता, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, अधीक्षक, कनिष्ठ अभियंता, उपअधीक्षक, लिपिक, शिपाई, मोकादम व सेवक वर्ग यांचा सक्रिय सहभाग होता. पोलिस प्रशासनाच्याही सहकार्यामुळे विसर्जनस्थळी शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरण राहिले.
या उपक्रमासाठी महापालिका आयुक्त मा. नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त मा. पृथ्वीराज बी. पी., उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन मा. संदीप कदम, परिमंडळ क्रमांक ४ चे उपायुक्त मा. प्रशांत ठोंबरे व उपायुक्त मा. खलाटे यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली कामकाज पार पडले. कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मा. राजेश कादबाने तसेच पाटणकर, खिलारे, पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
महापालिकेच्या नियोजनामुळे व अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे या वर्षीचे गणेश विसर्जन कोणत्याही अडचणीशिवाय, भक्तिमय आणि पर्यावरणपूरक वातावरणात पार पडले.


Recent Comments