Homeपुणेपुणे नवरात्रौ महोत्सवात यंदा मीनाक्षी मंदिराचा देखावा

पुणे नवरात्रौ महोत्सवात यंदा मीनाक्षी मंदिराचा देखावा

Newsworldmarathi Pune: पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात सातत्याने मोलाची भर टाकणारा “पुणे नवरात्रौ महोत्सव” यंदा विशेष आकर्षण घेऊन येत आहे. माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या श्री लक्ष्मी माता मंदिर, शिवदर्शन येथे यंदा मदुराई येथील सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिराचा देखावा साकारण्यात येणार आहे. या भव्य देखाव्याचे उद्घाटन सोमवारी, २२ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध सिने अभिनेत्रीच्या हस्ते होणार असून पुणेकरांसाठी हा एक आगळावेगळा सांस्कृतिक अनुभव ठरणार आहे.

या देखाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे तब्बल ७० फुटी उंच गोपुर. दक्षिण भारतीय शैलीत उभारण्यात आलेला हा गोपुर महोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य ठरणार आहे. उद्घाटनावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल यांनी केले आहे.

शिवदर्शन–सहकारनगर परिसरात आबा बागुल यांनी १९९३ च्या सुमारास दाक्षिणात्य धाटणीचे श्री लक्ष्मीमातेचे भव्य मंदिर उभारले. देवीच्या चरणी सेवा अर्पण करण्यासाठी त्यांनी “पुणे नवरात्रौ महोत्सव” सुरू केला. या महोत्सवाची सुरुवात कै. भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या अभंगवाणीने झाली होती. तसेच भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी य प्रसंगी पसायदान गाऊन शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे सुरुवातीपासूनच या उत्सवाला एक वेगळा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक आयाम लाभला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवात पुणेकरांना धार्मिक आणि सांस्कृतिक देखाव्यांचा संगम अनुभवायला मिळणार आहे. या वर्षीचा मीनाक्षी मंदिराचा देखावा पुणेकरांसाठी विशेष आकर्षण ठरणार असून देवीच्या चरणी सेवा अर्पण करताना दक्षिण भारताच्या मंदिर स्थापत्यशैलीचा अप्रतिम अनुभव घेण्याची संधी लाभणार आहे.

पुणे नवरात्रौ महोत्सव हे केवळ धार्मिक सोहळा न राहता सांस्कृतिक जडणघडणीतही महत्त्वाचे योगदान देत आहे. यंदा हा महोत्सव पुणेकरांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments