Newaworldmarathi Pune: राज्याच्या राजकारणातील एक धगधगते आणि कृतिशील नेतृत्व, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर लाखों चाहत्यांच्या उपस्थितीत, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात त्यांचे अकाली निधन झाले होते. आपल्या लाडक्या ‘दादां’ना अखेरचा निरोप देण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्र बारामतीत जणू एकवटला होता आणि “अजितदादा परत या…”, “अजित दादा अमर रहे..” अशा काळीज चिरणाऱ्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता.
बुधवारी, २८ जानेवारी रोजी सकाळी अजित पवार आपल्या नियोजित प्रचारसभांसाठी मुंबईहून बारामतीकडे ‘बंबार्डिअर लिअरजेट ४५ एक्सआर’ या ८ सीटर विमानाने रवाना झाले होते. सकाळी ८:१० मिनिटांनी विमानाने उड्डाण केले, मात्र ८:४५ च्या सुमारास बारामती धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच विमानाला भीषण अपघात झाला. दाट धुक्यामुळे दोन वेळा लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात विमान कोसळले आणि त्याला आग लागली. या दुर्घटनेत अजित पवारांसह वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, सुरक्षारक्षक विदीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.
अजित पवार यांचे पार्थिव आज सकाळी प्रथम त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले, जिथे पवार कुटुंबाने त्यांचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी सुनेत्रा पवार यांना शोक अनावर झाला होता, तेव्हा त्यांच्या नणंद सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांनी त्यांना सावरले. त्यानंतर सकाळी ९ वाजता त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली आणि सकाळी ११ वाजता पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणण्यात आले. महाराष्ट्र पोलिसांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि बिगुल वाजवून त्यांना शासकीय सलामी दिली. त्यानंतर त्यांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार आणि धाकटे चिरंजीव जय पवार यांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी “अजितदादा अमर रहे” आणि “परत या दादा” अशा घोषणांनी बारामतीचा परिसर दणाणून सोडला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांनी जड अंतःकरणाने अजित पवारांना अखेरचा मुजरा केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंचा बांध फुटला होता. प्रत्येकाच्या मनात ‘एक पर्व संपले’ हीच भावना दाटून आली होती.



Recent Comments