Homeपुणेमहाशिवरात्रीला भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर दर्शनासाठी बंद राहणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची माहिती

महाशिवरात्रीला भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर दर्शनासाठी बंद राहणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची माहिती

Newsworldmarathi Pune:
सन २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, कुंभकाळात नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांपैकी मोठ्या प्रमाणावर भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. साधारणपणे दररोज सुमारे एक लाख भाविक येथे येतील, असा अंदाज लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे.

या आराखड्यानुसार कुंभमेळा २०२७ दरम्यान गर्दी व्यवस्थापन व भाविकांसाठी सुरक्षित, सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध पायाभूत विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये नवीन भव्य सभामंडप, सुरक्षित प्रवेश व निर्गमन व्यवस्था, पायरी मार्ग तसेच गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. कुंभमेळ्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

कुंभमेळ्याच्या काळात अपेक्षित प्रचंड गर्दी लक्षात घेता सध्याचा जुना सभामंडप अपुरा पडणार असल्याने नवीन भव्य सभामंडप उभारण्यात येत आहे. तसेच पायरी मार्गाचे कामही सुरू आहे. या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर दगड, बांधकाम साहित्य व अवजड यंत्रसामग्री मंदिर परिसरात ठेवण्यात आली आहे. कामांचे स्वरूप, भौगोलिक परिस्थिती आणि भाविकांची संख्या लक्षात घेता बांधकाम सुरू असताना मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते.

पूर्वी भाविकांच्या सोयीसाठी महाशिवरात्रीचा कालावधी वगळून मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सध्याच्या बांधकामाचा वेग, व्याप्ती आणि सुरक्षिततेचा सखोल आढावा घेतल्यानंतर महाशिवरात्री कालावधीतही मंदिर खुले ठेवणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भीमाशंकर हा अतिवृष्टीचा भाग असल्याने जून ते सप्टेंबरदरम्यान बांधकाम करणे कठीण होते, त्यामुळे उपलब्ध कालावधीतच कामे पूर्ण करणे आवश्यक आहे.

या सर्व बाबींचा विचार करून दि. १२ फेब्रुवारी २०२६ ते दि. १८ फेब्रुवारी २०२६ या महाशिवरात्री कालावधीतही श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांच्या नित्यदर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे. भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments