Newsworldmarathi Pune: अपार व्यावसायिक यश मिळवूनही समाजाशी नाळ घट्ट ठेवणारे पुण्यभूषण नितीन रावजी देसाई यांचे ८ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मीना, मुलगी शितल, निशा, रिमा, जावई राजन, जय, तसेच नातवंडे असा परिवार आहे.
उद्योगविश्वात यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण करतानाच सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व हरपल्याने पुण्याच्या सामाजिक व औद्योगिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. व्यावसायिक यश ही अंतिम मंजिल नसून समाजाच्या उन्नतीसाठी ते साधन ठरले पाहिजे, हा विचार त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कृतीतून जपला.
१ नोव्हेंबर १९४३ रोजी पुण्यात जन्मलेल्या नितीन देसाई यांचे बालपण कसबा पेठेतील वाडा आणि चाळसंस्कृतीत गेले. आरसीएम गुजराती हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुढे गुजरातमधील करमसद येथील अभियांत्रिकी शिक्षणानंतर त्यांनी अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातून सिव्हिल आणि पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. अमेरिकेत उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध असतानाही मातृभूमीच्या ओढीने त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
भारतात परतल्यानंतर वडिलोपार्जित देसाई बिडी उद्योगाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी ब्रँडिंग, मार्केटिंग आणि उत्पादन व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणले. गुजरात, हरियाणा, पंजाब, राजस्थानसह देशभरात व्यवसाय विस्तारला. पुढे देसाई ब्रदर्स समूहाच्या माध्यमातून पारंपरिक लोणच्यांच्या उद्योगात गुणवत्ता, चव आणि विश्वासाचा ठसा उमटवला. तसेच अॅक्काफार्म केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून केमिकल उद्योगात भारतासह अमेरिकेतही व्यावसायिक भरारी घेतली.
उद्योगाबरोबरच सामाजिक बांधिलकी हा त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू राहिला. सह्याद्री हॉस्पिटलचे को-प्रमोटर म्हणून आरोग्य क्षेत्रात योगदान, सोसायटी फॉर फिजिकली हॅण्डीकॅपच्या माध्यमातून दिव्यांग व मुकबधिरांच्या शिक्षण व पुनर्वसनासाठी कार्य, तसेच एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलद्वारे लाखो गरजू रुग्णांना विनामूल्य नेत्रशस्त्रक्रियांची सुविधा देऊन त्यांनी लाखो रुग्णांना मोफत दृष्टी देण्याचे त्यांचे कार्य व्यवस्थात्मक आणि दीर्घकालीन होते. यासोबतच वनराई, जनसेवा फाउंडेशन, दिशा संस्था, धायरी व पानशेत येथील वृद्धाश्रम, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले. ते पूना क्लब आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष होते.
श्री पूना गुजराती बंधू समाज व दि पूना गुजराती केळवणी मंडळ यांच्या अध्यक्षपदी राहून शिक्षण क्षेत्राच्या विस्तारासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच PGKM स्कूल आणि जयराज स्पोर्ट कॉन्व्हेंशन सेंटर हे त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधी देशातील मोठे प्रकल्प पूर्ण झाले. तसेच विविध राष्ट्रीय व सामाजिक पुरस्कारांनी सन्मानित झालेले नितीन देसाई उद्योगातून समाजनिर्मितीकडे जाणाऱ्या मूल्याधिष्ठित उद्योजकतेचे प्रेरणास्थान होते. त्यांचे विचार आणि कार्य पुढील पिढ्यांना दिशा देत राहतील.
उद्योगातून समाजासाठी देणगी नव्हे, तर कर्तव्य म्हणून काम करणारे नितीन देसाई हे मूल्याधिष्ठित उद्योजकत्वाचे प्रेरणास्थान होते. त्यांचे विचार, कार्य आणि सामाजिक बांधिलकी पुढील पिढ्यांना निश्चितच दिशा देत राहतील.



Recent Comments