Newsworldmarathi Pune: पुणे महापालिकेतील महापौर व उपमहापौर पदाची निवड येत्या ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. महापालिकेच्या एकूण १६५ जागांपैकी भाजपचे तब्बल ११९ नगरसेवक निवडून आल्याने ही निवड प्रक्रिया औपचारिक ठरण्याची शक्यता आहे. मात्र, बहुमत असूनही भाजपने यावेळी जल्लोष टाळण्याचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
महापौर-उपमहापौर निवडीनंतर कोणताही उत्सव, गुलाल, फुले किंवा फटाके न फोडता केवळ एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानेच हा निर्णय घेतला असून तो पक्षाच्या सर्व नगरसेवकांना कळवण्यात आला आहे. याबाबतची माहिती भाजप गटनेते गणेश बिडकर यांनी दिली.
बिडकर यांनी सांगितले की, लोकभावना आणि सध्याच्या परिस्थितीचा विचार करून भाजपने संयमित भूमिका घेतली आहे. त्यामुळे विजयानंतरचा जल्लोष टाळून अत्यंत साधेपणाने प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. याचबरोबर महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा ठराव मांडण्यात येणार आहे.
भाजपच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, बहुमत असूनही दाखवलेला हा संयम पक्षाच्या धोरणात्मक भूमिकेचे प्रतीक मानला जात आहे. आगामी काळात महापालिकेच्या कारभारातही अशीच जबाबदार आणि संवेदनशील भूमिका ठेवली जाईल, असा संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.



Recent Comments