Newsworldmarathi Pune: ज्येष्ठ सामाजिक, कामगार नेते आणि कष्टकरी चळवळीचे मार्गदर्शक म्हणून ओळख असलेले बाबा आढाव यांचे आज रात्री निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारपणाशी झुंज देत होते. अखेर रात्री ८.२५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने कष्टकरी, असंघटित कामगार आणि सामाजिक चळवळींना आधार देणारा दृढ आवाज हरपला आहे.
बाबा आढाव यांनी आयुष्यभर मजूर, कष्टकरी, भटक्या- विमुक्त समाज, असंघटित कामगार आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा दिला. ‘एक गाव – एक पाणवठा’, ‘हक्काची वसुली’, ‘कष्टकरी संघटना’ यांसारख्या अनेक चळवळींनी त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि देशभरात नवे भान निर्माण केले. श्रमिकांच्या हक्कांसाठी त्यांनी चालवलेली चळवळ व्यापक झाली असून अनेकांच्या आयुष्यात बदल घडवणारा हा लढा ठरला.
त्यांच्या कामामुळे समाजातील वंचित घटकांना नवा आधार व नवीन दिशा मिळाली. कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी घेतलेली ठाम भूमिका, साधी जीवनशैली आणि निर्भीड स्वभावामुळे ते सर्वसामान्यांचा आवाज बनले. त्यांच्या जाण्याने सामाजिक परिवर्तन चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सामाजिक, राजकीय आणि कामगार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. कष्टकरी चळवळीचे प्रेरणास्थान हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.


Recent Comments