Newaworldmarathi Pune: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरू असलेल्या कामांना गती देण्यासाठी दिवे घाट आज, २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. आळंदी–पंढरपूर पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून युद्धपातळीवर सुरू असून, त्याअंतर्गत दिवे घाट परिसरात यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. कामादरम्यान वाहनांची ये-जा सुरू ठेवल्यास अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा दोन तासांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत दिवे घाट मार्गे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. कोंढवा, येवलेवाडी मार्गे बोपदेव घाट हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधित मार्गांवर वाहतूक सुरळीत राहावी यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
विशेषतः हडपसर, सासवड आणि आसपासच्या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांनी आपला प्रवास वेळेत नियोजित करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. दोन तासांनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



Recent Comments