Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक २२ मधील डायस प्लॉट परिसरात आज राजकीय घडामोडींना वेग आला असून अल्पसंख्याक काँग्रेसचे माजी पदाधिकारी तसेच मुस्लिम बँकेचे संचालक सादिक भाऊ लुकडे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे प्रभाग २२ मधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
सादिक भाऊ लुकडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना प्रभाग क्रमांक २२ मधील भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्चना तुषार पाटील तसेच भाजपच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला. त्यांनी यापुढे भाजपच्या धोरणांनुसार काम करत पक्षवाढीसाठी सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
यावेळी भाजप पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सादिक भाऊ लुकडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भाजपचे विकासाभिमुख धोरण, सर्वसमावेशक विचारधारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्यातील नेतृत्वाने राबवलेली कामे यामुळे आपण प्रभावित झालो असून, याच विचारातून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या प्रवेशामुळे प्रभाग २२ मध्ये भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली आहे. विशेषतः अल्पसंख्याक समाजातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपला याचा निश्चित फायदा होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
भाजपच्या उमेदवार अर्चना तुषार पाटील यांनी सादिक भाऊ लुकडे यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा आणि सामाजिक कार्याचा प्रभागाच्या विकासासाठी निश्चितच उपयोग होईल, असे मत व्यक्त केले. येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.


Recent Comments