Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३८ मध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष उपस्थिती लावली. भाजपच्या उमेदवारांचा विजयाचा एल्गार यावेळी जोरदारपणे करण्यात आला.
रॅलीदरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. शेकडो दुचाकींसह निघालेल्या या रॅलीमुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. “विकास, विश्वास आणि सक्षम नेतृत्वासाठी भाजप” असा संदेश देत मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील महायुती सरकारने राबवलेल्या विकासकामांची माहिती दिली. पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असून प्रभाग ३८ मधील विकासासाठी सक्षम प्रतिनिधी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. राणी भोसले या अनुभवी, कार्यक्षम आणि लोकाभिमुख उमेदवार असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच प्रभाग ३८ मधील भाजपच्या सर्व अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यामध्ये राणी भोसले यांच्यासह अश्विनी चिंधे, संदीप बेलदरे, व्यंकोजी खोपडे आणि प्रतिभा चोरगे यांचा समावेश आहे. सर्व उमेदवार एकत्रितपणे प्रभागाच्या विकासासाठी काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या बाईक रॅलीमुळे भाजपच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून प्रभाग ३८ मध्ये भाजपच्या विजयाबाबत कार्यकर्त्यांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.


Recent Comments