Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी संध्याकाळी थंडावल्या. या संपूर्ण प्रचारकाळात केंद्रीय राज्यमंत्री आणि पुणे महापालिका निवडणुकीतील भाजपाचे ‘कॅप्टन’ मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शहरात अक्षरशः प्रचाराचा धडाका उडवला. तब्बल २७ प्रभागांचा प्रत्यक्ष दौरा करत १०९ उमेदवारांच्या प्रचारात ते स्वतः मैदानात उतरले आणि पदयात्रा, बाईक रॅली, मतदारांशी गाठीभेटी, कॉर्नर सभा यांमधून संपूर्ण पुणे ढवळून काढले.
या प्रचारादरम्यान मोहोळ यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांचा, पायाभूत सुविधांचा आणि पुण्याच्या बदलत्या चेहऱ्याचा प्रभावीपणे आढावा मतदारांसमोर मांडला. ‘ट्रिपल इंजिन सरकार’मुळे पुण्याला मिळालेली मेट्रो, रिंग रोड, नदी पुनरुज्जीवन, २४ तास समान पाणीपुरवठा योजना, विमानतळाचे आधुनिकीकरण अशा विविध प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी पुण्याच्या भविष्यासाठी भाजपचाच पर्याय सक्षम असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्याबाबत बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘पुणेकरांनी विकास, स्थैर्य आणि पारदर्शक प्रशासनाला पसंती दिली आहे. जनतेचा प्रतिसाद पाहता भाजपाला या निवडणुकीत १२० ते १२५ जागा मिळतील आणि पुण्याचा महापौर भाजपचाच होईल, याबाबत आम्हाला पूर्ण खात्री आहे. पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारची भक्कम साथ आगामी काळातही मिळणार आहे.”
संपूर्ण प्रचारकाळात मोहोळ यांनी सामान्य नागरिकांपासून व्यापारी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, झोपडपट्टीवासीय, आयटी कर्मचारी अशा विविध घटकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता, सुरक्षा आणि पर्यावरणपूरक विकास या प्रमुख मुद्द्यांवर भाजपची ठोस भूमिका त्यांनी मतदारांसमोर स्पष्ट केली.
पुणे महापालिकेच्या या निवडणुकीत भाजपने विकास, सुशासन आणि स्थिर नेतृत्वाचे मॉडेल मांडले असून मोहोळ यांच्या आक्रमक, नियोजित आणि लोकसंपर्काधारित प्रचारामुळे शहरभर भाजपचा आत्मविश्वास आणि सकारात्मक वातावरण दिसून आले.
मोहोळ पुढे म्हणाले की, भाजपने संपूर्ण प्रचारकाळात सकारात्मक व विकासकेंद्रित मुद्द्यांवर भर दिला. प्रचाराची पातळी न घसरवता पुणेकरांच्या भविष्यासाठी ठोस अजेंड्यासह जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. २०१७ नंतर ट्रिपल इंजिन सरकारमुळे पुण्यात विकासाला मोठी गती मिळाली असून मेट्रोचे काम देशात सर्वाधिक वेगाने सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले. निवडणूक निकालानंतर कोणत्याही अन्य पक्षासोबत जाणार नाही, असे स्पष्ट करत पुणेकरांच्या अपेक्षांनुसार भाजप स्वतंत्रपणे जबाबदारी सांभाळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Recent Comments