Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या २०१७ साली झालेल्या निवडणुकांदरम्यान कोंढवा–येवलेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंद झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आजही सुरू आहे. त्या काळात मतदार यादीत बाहेरील व्यक्तींची नावे समाविष्ट झाल्याचे तसेच वास्तव्यात नसलेल्या नागरिकांची नोंद आढळल्याचे आरोप स्थानिक पातळीवर करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर यंदा होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उदयसिंह मुळीक यांनी केली आहे.
कोंढवा–येवलेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक संघटना आणि जागरूक मतदारांनी पोलीस प्रशासन व निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदार यादी तपासणीसह सर्व प्रक्रिया काटेकोरपणे राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मतदार नोंदणी, पत्त्यांची पडताळणी, तसेच संशयास्पद नोंदींची सखोल चौकशी करण्यात यावी, असे मत नागरिकांचे आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह राहण्यासाठी प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलावीत, अन्यथा लोकशाहीच्या रक्षणासाठी जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे. येणाऱ्या निवडणुकांत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारी गंभीरपणे घ्याव्यात, अशी सर्वसामान्य अपेक्षा व्यक्त होत आहे.


Recent Comments