Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ (सूस–बाणेर–बालेवाडी–पाषाण) ही लढत शहरातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली होती. या प्रभागात भाजपचे उमेदवार लहू बालवडकर आणि भाजपमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले अमोल बालवडकर यांच्यात थेट सामना रंगला होता. एकाच आडनावामुळे आणि राजकीय पार्श्वभूमीमुळे ही लढत अधिकच लक्षवेधी ठरली.
या निवडणुकीदरम्यान राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लहू बालवडकर हे राज्यात सर्वाधिक मते घेऊन विजयी ठरतील, असे भाकीत केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रभाग क्रमांक ९ च्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राजकीय वर्तुळासह सामान्य नागरिकांमध्येही या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ९ चा निकाल काल (१६ जानेवारी) रात्री उशिरा जाहीर झाला. या अटीतटीच्या आणि अत्यंत चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांनी विजय मिळवला आहे. दोन्ही बाजूंच्या उमेदवारांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी मतमोजणीदरम्यान अनेक वेळा आक्षेप नोंदवले. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात आली होती.
आक्षेप, चर्चासत्रे आणि पडताळणी यामुळे निकाल जाहीर होण्यास विलंब झाला. अखेर रात्री उशिरा मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर अमोल बालवडकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. या निकालामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
या निकालाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाजपसाठी हा निकाल धक्कादायक ठरल्याचे बोलले जात आहे. प्रभाग क्रमांक ९ चा हा निकाल आगामी शहर राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.


Recent Comments