Newsworldmarathi Pune: कृषी २०२६ प्रदर्शनाच्या निमित्ताने शनिवारी बारामतीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. या वेळी संयुक्तपणे प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले. त्यामुळे राज्याच्या ग्रामीण राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, अभिनेता-खासदार अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दत्तात्रय भरणे, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीत अलीकडील निवडणूक निकालांचा आढावा घेण्यात आला तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीतीवर चर्चा झाली.
कृषी प्रदर्शनाची पाहणी केल्यानंतर नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधताना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी एकत्रितपणे लढण्याची भूमिका जाहीर केल्याचे संकेत दिले. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची ताकद एकत्र करून संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर बारामतीत लवकरच शरद पवार आणि अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पत्रकार परिषदेत आगामी निवडणुकांबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, त्याचे पडसाद राज्याच्या आणि विशेषतः बारामती परिसराच्या राजकारणात उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.


Recent Comments