Newaworldmarathi Pune: द पुना गुजराती केळवणी मंडळाच्या हरिभाई व्ही देसाई महाविद्यालयातील देसाई करंडक स्पर्धेत पहिला क्रमांक मिळविणाऱ्या डी वाय पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आणि पी व्ही जी महाविद्यालयाच्या विशेष प्राविण्याबद्दल समारोप प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व संस्थेचे चेअरमन डॉ राजेश शहा यांनी ‘आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिक वाव मिळतो आणि त्यांच्यातील कल्पक शक्ती वाढीस लागते’ असे प्रतिपादन केले.
द पूना गुजराती केळवणी मंडळाच्या हरिभाई व्ही. देसाई कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात देसाई करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक व बिगरतांत्रिक अशा एकूण १३ विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
पी. व्ही. जी. महाविद्यालय, डी. वाय. पाटील महाविद्यालय, इंदिरा महाविद्यालय, सरहद महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, पूना कॉलेज, हुजूरपागा यांसह पुण्यातील ६२ महाविद्यालयांतील सुमारे १००० विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी या तीन दिवसीय कार्यक्रमाची सांगता पारितोषिक वितरण समारंभाने झाली. द पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेशभाई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी तीन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन देसाई करंडक स्पर्धांचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर मांडला. पुणे ग्रँड टूर या सायकल मॅरेथॉन च्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात विक्रमी संख्येने येऊन सहभाग घेणाऱ्या तरुणांचे व त्यांच्या लढवय्या वृत्तीचे प्राचार्यांनी विशेष कौतुक केले. डॉ. राजेशभाई शहा यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाचे कौतुक करताना स्वतःचे अनुभव कथन केले तसेच स्पर्धेतील विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यंदाच्या वर्षी डी. वाय. पाटील महाविद्यालय, पिंपरी हे देसाई करंडकाचे मानकरी ठरले, तर पी. व्ही. जी. महाविद्यालयाला सर्वाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविल्याबद्दल विशेष करंडक प्रदान करण्यात आला.
या पारितोषिक वितरण समारंभास द पूना गुजराती केळवणी मंडळाचे सचिव श हेमंत मणियार, सहसचिव दिलीप जगड व विनोद डेडिया हे मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण उपक्रमाचे यशस्वी संयोजन मोनिका धोत्रे व रुता वैद्य यांनी केले.



Recent Comments