Homeपुणेस्वारगेट मल्टी हब मेट्रो स्टेशनला दिवंगत अजितदादा पवार यांचे नाव द्या ...

स्वारगेट मल्टी हब मेट्रो स्टेशनला दिवंगत अजितदादा पवार यांचे नाव द्या : रोहन सुरवसे पाटील

Newaworldmarathi Pune : स्वारगेट येथे उभारण्यात येत असलेल्या मल्टी हब मेट्रो स्टेशनला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात पुणे मेट्रो रेल प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी निवेदन दिले आहे. दरम्यान, हर्डीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, प्रशासकीय पातळीवर योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे.

सुरवसे यांनी दिलेल्या निवेदनात दिवंगत अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख कार्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि शहरी विस्तार लक्षात घेऊन आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने पुणे मेट्रो प्रकल्प साकारण्यात त्यांच्या पुढाकाराची भूमिका महत्त्वाची होती, असे नमूद करण्यात आले आहे. प्रशासकीय मान्यता मिळवणे, निधीची उपलब्धता आणि विविध विभागांमध्ये समन्वय साधणे या बाबींमध्ये त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे निवेदनात म्हटले आहे.

स्वारगेट हे पुणे शहरातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र असून बसस्थानक, मेट्रो सेवा आणि इतर प्रवासी सुविधांचा एकत्रित संगम येथे होणार आहे. त्यामुळे हे ठिकाण ‘मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब’ म्हणून विकसित होत आहे. अशा महत्त्वाच्या ठिकाणाशी दिवंगत अजितदादा पवार यांचे नाव जोडणे ही त्यांच्या कार्याला योग्य आदरांजली ठरेल, असे ही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

“कामाचा माणूस” अशी ओळख असलेल्या स्व. पवार यांनी रस्ते, सिंचन, उद्योग, शिक्षण व नागरी प्रकल्पांच्या उभारणीत दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांच्या स्मृती जतन व्हाव्यात, या उद्देशाने स्टेशन नामकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. दरम्यान, या मागणीच्या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments