Homeपुणेपूना गुजराती केळवणी मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

पूना गुजराती केळवणी मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

Newaworldmarathi Pune : पूना गुजराती केळवणी मंडळाच्या आर.सी.एम. दारूवाला स्कूलच्या शताब्दी वर्षानिमित्त १९७३ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तब्बल ५३ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक क्षण अनुभवले.

कोंढवा येथील जयराज क्लबमध्ये रविवारी (दि. १९) आयोजित या कार्यक्रमात सुमारे ४० माजी विद्यार्थी सपत्नीक सहभागी झाले होते. शाळेतील खोड्या, एकत्रित अभ्यास, शिक्षकांचा वचक, क्रीडा स्पर्धा, शिक्षा आणि स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी पुन्हा एकदा बालपण अनुभवले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गेल्या दशकात दिवंगत झालेल्या सहाध्यायांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर जयराज क्लबची पाहणी करण्यात आली. सर्वांनी एकत्रित समूह छायाचित्र काढून या अविस्मरणीय भेटीची नोंद केली. पुढे संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या बॅचमधील काही विद्यार्थी मुंबई, राजकोट (गुजरात), कॅनडा आणि अमेरिका येथे स्थायिक असून त्यांनी शुभेच्छा संदेश पाठवले. ते संदेश कार्यक्रमात वाचून दाखवण्यात आले. प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील अनुभव आणि भावना व्यक्त करत मैत्रीचे बंध अधिक दृढ केले.

या प्रसंगी मंडळाचे चेअरमन डॉ. राजेश शहा म्हणाले, “ज्या शाळेतून मी १९७३ साली एसएससी उत्तीर्ण झालो, त्याच संस्थेच्या चेअरमनपदी २०२२ मध्ये काम करण्याची संधी मिळणे हा माझ्या आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.” त्यांनी जयराज क्लबच्या उभारणीत माजी विद्यार्थ्यांचे योगदानही अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. तसेच भविष्यात अशाच स्नेहमेळाव्यांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. उपस्थित महिलांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचेही नियोजन केले. या स्नेहमेळाव्याचे आयोजन डॉ. राजेश शहा, अतुल शहा, वीरेंद्र शहा, रश्मी गांधी, रणजीत पोरवाल, प्रकाश शहा आणि मदन शहा यांनी केले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments